ओझर-धनगरवाडीचा पाण्याचा प्रश्‍न ‘जैसे थे’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

राजापूर - गतवर्षी तालुक्‍यातील ओझर-धनगरवाडी येथील धरणामध्ये पाण्यासाठी गेलेल्या कोकरे मायलेकींचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने ओझर-धनगरवाडीच्या पाण्याचा प्रश्‍न चांगलाच चर्चेत आला होता. 

सुमारे वीस घरे असलेल्या या वाडीतील लोकांचा पाण्याचा प्रश्‍न ‘जैसे थे’ आहे. कोकरे मायलेकींसाठी काळ ठरलेल्या ओझर धरणाच्या पाणीसाठ्यासह नैसर्गिक झऱ्यावर लोकांना अवलंबून राहावे लागत आहे.  

राजापूर - गतवर्षी तालुक्‍यातील ओझर-धनगरवाडी येथील धरणामध्ये पाण्यासाठी गेलेल्या कोकरे मायलेकींचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने ओझर-धनगरवाडीच्या पाण्याचा प्रश्‍न चांगलाच चर्चेत आला होता. 

सुमारे वीस घरे असलेल्या या वाडीतील लोकांचा पाण्याचा प्रश्‍न ‘जैसे थे’ आहे. कोकरे मायलेकींसाठी काळ ठरलेल्या ओझर धरणाच्या पाणीसाठ्यासह नैसर्गिक झऱ्यावर लोकांना अवलंबून राहावे लागत आहे.  

गेल्या महिन्यात तालुक्‍याच्या संभाव्य पाणीटंचाई आराखडा बैठकीमध्ये ओझर-धनगरवाडीच्या पाणी समस्येबाबतचा प्रश्‍न ग्रामसेवक अनिल पिठलेकर यांनी प्रश्‍न उपस्थित करून उपाययोजनेची मागणी केली होती. त्याची दखल घेत आमदार राजन साळवी यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे विजय मेंगे यांना या लोकांना पाणीपुरवठा होईल, अशा नळ-पाणी योजनेचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी आवश्‍यक ग्रामपंचायतीचा प्रस्ताव दोन दिवसांमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला देण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक श्री. पिठलेकर यांनी सांगितले.

तालुक्‍याच्या पूर्व भागामध्ये ओझर गाव असून गावाच्या एका टोकाला धनगरवाडी आहे. या वाडीमध्ये सुमारे वीस घरे असून ती विखुरलेल्या स्थितीत आहेत. 

विविध सुविधांसह कायमस्वरूपी पाण्याची प्रतीक्षा गेली अनेक वर्षे आहे. डोंगरदऱ्यामध्ये वसलेली टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी शासनातर्फे लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. 

ओझर-धनगरवाडीला सुलभ पाणीपुरवठा होण्याच्या या वाडीतील लोकांना पाणी पुरवठ्यासाठी कोणतीही नळ-पाणी योजना अन्य शासकीय सुविधा झालेली नाही. त्यामुळे या वाडीतील लोकांना नैसर्गिक जलस्रोत आणि वस्तीपासून काही किमी अंतरावर असलेल्या धरणाच्या पाणीसाठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. 

एप्रिल-मे महिन्यामध्ये नैसर्गिक जलस्रोत कमी झालेले असताना या लोकांना धरणाच्या पाणी साठ्यावर पूर्णपणे अवलंबून राहावे लागत आहे. 
मुख्य जलस्त्रोत असलेल्या येथील धरणात पाणी आणण्यासाठी गेलेल्या कोकरे मायलेकींचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे या धरणावर पाणी भरण्यासाठी जाण्यास येथील ग्रामस्थ धजावत आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे. 

ओझर-धनगरवाडीचा पाणीप्रश्‍न संपुष्टात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे लवकरच आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल.
- विजय मेंगे, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, राजापूर

Web Title: ozat-dhangarwadi water issue