बल्लाळेश्वराच्या माघी मासोत्सवानिमित्त पाली भक्तिमळ फुलला…

बल्लाळेश्वराच्या माघी मासोत्सवानिमित्त पाली भक्तिमळ फुलला…
बल्लाळेश्वराच्या माघी मासोत्सवानिमित्त पाली भक्तिमळ फुलला…

पाली (रायगड): अष्टविनायक देवस्थानापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान पालीत आहे. श्री बल्लाळ विनायकाच्या माघ मासोत्सवानिमित्त पालीत आज (शुक्रवार) हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी पाच वाजता मंदिर उघडल्या नंतर भाविकांनी दर्शन घेतले. संपुर्ण महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या भाविकांनी बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले.

श्री बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सवमिती माघ शु. 1 शके 1940 मंगळवार ता. 5 ते मिती माघ शुध्द 5 शके 1940 रविवार ता. 10 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होत आहे. माघी मासोत्सवानिमित्त पालीत विविध धार्मीक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर व मंदिर परिसरात सर्वत्र आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच यानिमित्त पाली शहरात भव्य जत्रा भरली आहे. भाविकांच्या सोयीसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी मोफत पाणी पुरवठा व अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

माघ महोत्सवानिमित्त पाच दिवस रोज रात्री किर्तन, गायन, प्रवचन, भजन आदि कलांसह विवीध सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले जात आहेत. शु. चतुर्थीला शुक्रवारी  (ता.8) श्री जन्माचे अख्यान झाले व सायंकाळी श्रींची पालखी मिरवणूक संपुर्ण गावातुन उत्साहात निघणार आहे. चतुर्थीच्या दिवशी शुक्रवारी (ता.8) रात्री श्रीं समोर महानैवेद्दय दाखवला जाणार आहे. तो पाहण्यासाठी लाखो भाविक पहाटे पासुनच रांगा लावुन उभे राहतील. पंचमीला शनिवारी (ता.9) सर्व भक्तांना भोजनाचा महाप्रसाद दिला जाणार आहे. तसेच श्री गणेश मंडळ यासंस्थेमार्फत तीन अंकी नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. संपूर्ण मासोत्सवाचे पाली पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांच्यासह बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच अॅड. धनंजय धारप, उपसरपंच जितेंद्र गद्रे, विश्वस्त माधव साने, विनय मराठे, उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहूल मराठे आदिंनी योग्य नियोजन व व्यवस्थापन केले होते.

योग्य नियोजन व व्यवस्थापन
भाविकांना रांगेत व शिस्तबध्दरित्या दर्शन घेता यावे याकरीता देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासन व पाली ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मनिडोअर स्टॅंड व एस टी स्टॅंड वरुन देवळापर्यंत आणण्यासाठी देवस्थान तर्फे मोफत वाहतुक व्यवस्था केली गेली होती. वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी पाली पोलीस व देवस्थानचे सुरक्षा रक्षक घेत होते. उत्सवादरम्यान रुग्णवाहीकेची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना प्रसाद व पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अग्निरोधक यंत्र बसविण्यात आले होते.

उत्सवाची खास वैशिष्टे
माघ मासोत्सवानिमित्त पालीत मोठी यात्रा भरली आहे. खेळणी, गृहोपयोगी वस्तू, हाॅटेल तसेच वेगेवेगळ्या प्रकारची दुकाने सजली होती. पाळणे आले होते.

अवयवदान व रक्तदानासाठी प्रबोधन,
सकाळ पासूनच भर उन्हात माईकवर येथील प्राथमिक शिक्षक कुणाल पवार अवयवदान व रक्तदानासाठी जनजागृती व प्रबोधन करत होते. त्यांनी अवयव दानाच्या अर्जाचे व माहिती पत्रकांचे वाटप केले. कुणाल पवार यांनी स्वतः सपत्नीक अवयवदानाचा व रक्तदानाचा संकल्प केला आहे. यावर न थांबाता याबाबत समाजात जनजागृती करण्याचा विडा उचलला आहे. त्या अनुषंगाने ते आपले काम करत आहे. यात्रेत आलेल्या असंख्य भाविकांनी त्यांच्या या कामाचे कौतूक करुन अवयवदानाचे अर्ज घेतले. तसेच तंबाखू मुक्त संकल्प देखील केला.

देवस्थान तर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम व सेवा योजना
1) भक्तनिवास : भाविकांसाठी भक्तनिवास क्र.1 व क्र.2 असे दोन यात्रीनिवास. भरपूर पाणी, सुसज्ज खोल्या व स्वयंपाकघराची व्यवस्था उपलब्ध.
2) मोफत पार्कींग : तीन एकर जागेवर मोफत वाहनतळ
3) शैक्षणिक मदत : सुधागड तालुक्यातील गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तकांचे वाटप व विशेष नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार.
4) वैद्यकीय सेवा : गरीब-गरजू लोकांसाठी वैद्यकीय सेवा. यात नामांकित तज्ञ डॉक्टरांकडून महिन्यातील चार रविवारी तपासणी केली जाते. देवस्थान व लालचंद रोहरा रोटरी चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे गरीब-गरजू रुग्णांना मोफत तर अन्य रुग्णांची माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येते.
5) प्रसादालय : समस्त भाविकांना सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत अत्यल्प दरात भोजनप्रसाद घेता येतो.
6) खतनिर्मिती प्रकल्प : श्री ना समर्पित केलेल्या दुर्वा, हार, फुलांचे निर्माल्य झाल्यावर, यापासून खत निर्मितीचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
7) सोलर एनर्जी : भक्तनिवास क्र.1 व क्र.2 येथे सुर्यप्रकाशापासून उर्जा निर्मिती युनिट्स बसविण्यात आली आहेत. यातून भक्तांना गरम पाणी मिळते.
8. लाडू प्रसाद योजना
या सर्व योजना भाविकांनी दिलेल्या देणगी व मदतीवर अवलंबून असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com