
पालीतील जळालेला मेणबत्ती व सुगंधी तेल कारखाना बंद करा, मालकाला नोटीस
पाली : पालीतील कुंभारआळी जवळील भर वस्तीत असलेल्या मेणबत्ती व सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली होती. या घटनेची दखल घेत बुधवारी पाली नगरपंचायतीने ‘इंडियन व्हेस्क फेम पार्टनर’ या कारखान्याच्या मालकांना नागरी वस्तीतील कारखाना (आस्थापना) बंद करण्यासंबंधी पत्र दिले आहे. या पत्रात म्हंटले आहे की महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम नियम-२००६ च्या अनुषंगाने चालवत असलेली आस्थापना आवश्यक त्या उपायोजना करण्यास अपयशी ठरल्याचे निदर्शनास आलेले आहे.
ज्याअर्थी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन संरक्षण उपाययोजना अधिनियम २००६ (२००७ चा महा ३) यांच्या तरतुदीखाली आवश्यक केल्याप्रमाणे या कारखान्यात बसविण्यात आलेली आग प्रतिबंधात्मक साधने सुस्थितीत व कार्यन्वयीत स्थितीत ठेवण्यात आलेली नाहीत. तसेच त्या संदर्भीय कुठल्याही उपाययोजना आढळुन आलेल्या नाहीत. मेणबत्ती उत्पादन म्हणजे पेट्रोलियम सारखेच अती ज्वलनशील उत्पादन आपण कुठल्याही योग्य त्या सुरक्षाव्यवस्था व्यतीरीक्त करून लोकांच्या जिवाशी खेळत आहेत. त्याचप्रमाणे सनफ्लॉवर ऑइलने भरलेले डबे कुठल्याही सुरक्षा शिवाय उघड्या आग भट्टांसमोर दिसुन येत आहेत. या कारखान्याच्या चारही बाजुला अत्यंत घनदाट वस्ती असल्याने कारखान्याच्या प्रदुषणाचा खुप मोठा त्रास येथे राहणाऱ्या जनतेला सातत्याने होत आहे.
या कारखान्यामुळे सार्वजनिक जीवीतास बाधा पोहोचत आहे. त्यामुळे नोटिस मिळाल्या पासून आपली हा कारखाने सांगितलेल्या उपाययोजना करेपर्यंत व सक्षम प्राधीकरणाच्या सर्व परवानग्या घेऊन योग्य त्या उपाययोजना करे पर्यंत बंद ठेवण्यात यावा. आणि आपला कारखाना (आस्थापना) नागरी वस्तीतून बाहेर काढण्यात यावा असे पत्रात नमूद केले आहे.