पाली ग्रामपंचायत प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर

अमित गवळे 
रविवार, 18 मार्च 2018

राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी आदेशीत केलेला जुन 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

पाली (जि. रायगड) - अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्वरचे स्थान असलेल्या पाली ग्रामपंचायतीची प्रभागरचना व आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पाली नगरपंचायत स्थापन न होता, पाली ग्रामपंचायत स्थापन होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मात्र पालीकरांना सुनियोजित प्रशासन आणि योग्य सोइसुविधा मिळाव्यात यासाठी अनेक नागरिकांनी नगरपंचायतीची मागणी केली आहे.

राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी आदेशीत केलेला जुन 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पाली ग्रामपंचायतीची मुदत 27 जुलै 2018 पर्यंत असल्याने ग्रामपंचायतीची प्रभागरचना व आरक्षण जाहीर करण्यात आले असून एकूण 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे होवू घातलेल्या पाली नगरपंचायत की ग्रामपंचायत हा पेच सुटला असल्याचे तुर्तास स्पष्ट झाले आहे. मात्र नागरीकांकडून सदर प्रभागरचना व आरक्षणाबाबत दावे, सुचना व हरकती प्राप्त झाल्यास यामध्ये फेररचना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच नगरविकास विभाग व शासन यांनी ठरवून आवश्यक तो प्रस्ताव सादर केल्यास पाली नगरपंचायत होण्याचा आशावाद देखील व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पाली ग्रामपंचायत की नगरपंचायत अशा दुहेरी संभ्रमात लोक आहेत. 

पालीच्या सुनियोजित विकासासाठी पाली ग्रामपंचायत की नगरपंचायत हवी यासाठी काही सुज्ञ नागरिकांनी या संदर्भात रविवारी (ता. 18) सायंकाळी येथील भक्तनिवास क्र. 2 मध्ये सर्वांसाठी खुली चर्चा आयोजित केली होती. पाली ग्रामपंचायत व नगरपंचायत यासंदर्भात जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडून पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन मागविले असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पाली तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांनी सांगितले. 

अशी आहे प्रभाग रचना आणि प्रक्रिया -
पाली-सुधागड तहसिलकार्यालयामार्फत पाली ग्रामपंचायतीची प्रभागरचना व आरक्षण यासंदर्भात शनिवारी (ता. 17) अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. 20) प्रभागरचनेला मान्यता देणेसाठी पाली तहसिलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांचा समावेष असलेली समिती गठीत करण्यात आली असून ही समिती प्रभागरचना व आरक्षणाला मान्यता देणार आहे. जाहीर झालेल्या प्रभागरचना व आरक्षणावर बुधवार (ता. 21) ते रविवार (ता. 25) पर्यंत सुचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. गुरुवारी (ता. 29) पर्यंत नागरीकांकडून येणार्‍या सुचना व हरकती उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. यावर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून निर्णय होवून सदर प्रस्ताव 05 एप्रिलपर्यंत जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सादर केले जाणार आहे. उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून 11 एप्रिलपर्यंत जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडून सदर प्रस्तावाला अंतीम मान्यता दिली जाणार आहे.

13 एप्रिलपर्यंत जिल्हाधिकारी रायगड यांनी मान्य केलेल्या अंतीम प्रभागरचनेला (नमुना अ) मध्ये व्यापक प्रसिध्दी दिली जाणार आहे. त्यानंतर मतदार यादीचा पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.  सदर प्रभागरचना गुगलमॅपवरुन तयार करण्यात आली आहे. सन 1011 च्या जनगणनेनुसार प्रभागरचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये 1 अनुसुचीत जाती, 1 अनुसुचीत जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग खुला 5 जागा, 10 सर्वसाधारण अशा एकूण 17 जागांसाठी निवडणुक पार पडेल. 17 जागांपैकी 3 ना. मा. प्र. महिला व 6 सर्वसाधारण महिला अशा एकूण 9 जागांसाठी महिलांना निवडणुक लढविण्याची संधी प्राप्त होणार आहे. 

Web Title: Pali Gram Panchayat division composition and reservation announced