पाली ते खोपोली राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था

अमित गवळे
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

पाली - पाली ते खोपोली हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. या मार्गाची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून प्रवास करणे धोकादायक व जिकरीचे झाले आहे. हा मार्ग लवकर सुस्थितीत करण्यात यावा यासाठी ग्रामस्थ व राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. परिणामी याबाबत तातडीने बैठक घेऊन वीस दिवसात रस्ता सुरळीत करण्याचे आश्वासन एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी दिले.

पाली - पाली ते खोपोली हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. या मार्गाची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून प्रवास करणे धोकादायक व जिकरीचे झाले आहे. हा मार्ग लवकर सुस्थितीत करण्यात यावा यासाठी ग्रामस्थ व राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. परिणामी याबाबत तातडीने बैठक घेऊन वीस दिवसात रस्ता सुरळीत करण्याचे आश्वासन एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी दिले.

या रस्त्याचे रुंदीकरण होत असतांना सध्या वाहतूक होत असलेल्या रस्त्याच्या बाबतीत मात्र कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहे. जुन्या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीस असलेला रस्त्याला अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबरीकरण निघून गेल्याने रस्ते अतिशय खराब झाले आहे. या रस्त्यांची डागडुजी करण्याच्या कामाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे. रस्ता रुंदीकरणाचे कामात साईड पट्टी मातीने भरल्यामुळे यावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे मातीचा धुरळा उडत आहे. याचा प्रवासी व चालकांना त्रास होत असून या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वाहतुकीचा रस्ता सुरळीत न केल्यास सुधागड व खालापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचे आवेदन तहसीलदार कार्यालयात दिले होते. या बाबतीत एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच कंत्राटदाराबरोबर तातडीची बैठक आयोजित केली होती. यावेळी एमएमआरडीच्या अतिरिक्त मुख्य अभियंता कर्नल रवी घोडके यांनी वीस दिवसात रस्ता सुरळीत करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीला सुधागड व खालापूर तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये परळी चे सरपंच संदेश कुंभार, मनसेच्या महिला जिल्हा चिटणीस लता कांबळे, मनसे तालुका अध्यक्ष सुनील साठे, सचिन झुंजारराव, सरपंच भास्कर पाटील, प्रकाश आवास्कर, अॅड. प्रवीण कुंभार, शेखर डोंगरे, सतीश पवार, दादू गोळे, तसेच एमएमआरडी अतिरिक्त मुख्य अभियंता कर्नल रवी घोडके, कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, उप अभियंता सचिन निफाडे, निवासी अभियंता भूषण फुले , तहसीलदार बाबुराव निंबाळकर आणि बेग कन्ट्रक्शन कंपनीचे शाखा अधिकारी तौकीर राठेर अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी मनसे च्या महिला जिल्हा चिटणीस लता कांबळे म्हणाल्या की, आपण प्रत्येक वेळी देत असलेला शब्द पाळत नाही व कोणतेही कारण सांगून विषय टाळून नेत असतात परंतु आता दिलेला शब्द जर पाळला गेला नाही तर आंदोलन व अधिकाऱ्यांना डांबून ठेऊ असा इशारा यावेळी दिला. 

रस्त्याच्या कामात दुर्लक्ष
पावसाळ्याच्या दिवसात काम जोमाने सुरु होते परंतु मागील दोन महिने हे काम बंद झाले होते या संदर्भात पालक मंत्री ना रवींद्र पाटील यांच्याकडे झालेल्या मिटिंग मध्ये कंत्राटदाराने काम सुरु करावे आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करून द्यावा असे आदेश देण्यात आले होते. परंतु कंत्राटदार रस्ता रुंदीकरण व मूळ वाहतुकीच्या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले. 

कंपनी बदलली
यावेळी एमएमआरडी अतिरिक्त मुख्य अभियंता कर्नल रवी घोडके यांनी सांगितले कि वराह इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा.ली. कंपनीच्या वतीने ज्या कंपनीला काम देण्यात आले होते त्यांचा कमी कामाचा अनुभव व  नियोजन योग्य न केल्यामुळे हि परिस्थिती आली. आता बेग कन्ट्रक्शन रस्त्याच्या कामाच्या क्षेत्रात अग्रेसर कंपनी असून या पुढील काम आता हि कंपनी सुरु करणार असून येत्या एक फेब्रुवारी १९ पर्यंत पूर्ण रस्ता वाहतुकीस योग्य प्रथम करून देऊ आणि नंतर रुंदीकरणाचे काम सुरुवात होणार आहे असे स्पष्ट केले. 

Web Title: Pali to Khopoli National Highway need to repair