रॅपलिंगच्या साह्याने सुधागडाची स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींची मोहीम

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींची मोहीम
पाली (जि. रायगड) - सरकार किल्ल्याची डागडुजी करील तेव्हा करील, आपले किल्ले, आपला इतिहास आपणच जपला पाहिजे. आपणच सह्याद्रीचा हा देदीप्यमान वारसा पुढे तेवत ठेवला पाहिजे, या हेतूने अनेक दुर्गप्रेमी आणि मराठा युवा संघटनेचे तरुण एकत्र आले. त्यांनी रविवारी (ता. 21) सुधागड किल्ला स्वच्छता मोहीम राबवली. किल्ल्यावरील झाडाझुडपांनी वेढलेले बुरूज चक्क रॅपलिंग करून साफ करण्यात आले. अवघड ठिकाणांवरील साफसफाई करण्यात आली.

गडकिल्ल्यांचे संवर्धन करावे, या हेतूने दर्शन तळेकर, सुजय हुले, प्रदेश शेडगे, प्रदीप गोळे, तेजस भगत या दुर्गप्रेमींनी या मोहिमेत पुढाकार घेतला. त्यास मराठा युवा संघटनेच्या युवकांनी साथ दिली आणि व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारे मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन सर्वांना करण्यात आले. ऐतिहासिक सुधागड किल्ल्यावर रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्याचे निश्‍चित केले. त्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले. अनेक दुर्गप्रेमी या मोहिमेत जोडले गेले. ठरल्यानुसार सुधागड किल्ला चकाचक करण्यात आला. दुपारचे जेवण गडावरच बनवण्यात आले. काम संपल्यावर भगवा फडकवून मोहीम फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

पाली (जि. रायगड) - सुधागड किल्ल्याच्या बुरजांवरील झाडेझुडपे रॅपलिंगच्या साह्याने साफ करताना दुर्गप्रेमी.

Web Title: pali konkan news sudhagad cleaning by rapling