मुसळधार पावसाने पर्यटनस्थळे बहरली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

सलग सुट्यांची पर्वणी; किनारे, तीर्थस्थळांवर गर्दी

पाली - शनिवार ते सोमवार जोडून सुट्या आणि शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली आहेत. समुद्रकिनारे व धार्मिक स्थळांवर पर्यटकांनी, भाविकांनी गर्दी केली आहे. पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.

काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. नद्या व धबधब्यांना पाणी नव्हते. परिणामी पावसाळी पर्यटनाचा श्रीगणेशा झाला नव्हता. शनिवार रात्रीपासून पाऊस सुरू झाल्याने ठिकठिकाणी धबधबे दृष्टीस पडू लागले आहेत. सलग सुट्यांत पावसाची मौज अनुभवण्यासाठी पर्यटक बाहेर पडले आहेत. पाली व महाड येथील अष्टविनायक आणि हरिहरेश्वर येथील तीर्थक्षेत्रावर भाविकांची रीघ लागली होती. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड, दिवेआगर आदी समुद्रकिनाऱ्यांवरही पर्यटकांची गर्दी होती. पावसात चिंब भिजून पर्यटक सुटीचा आनंद घेत होते. पावसाचा जोर असाच राहिल्यास दोन-तीन दिवसांत मोठे धबधबे वाहू लागतील.
 
माथेरानमध्ये घोड्याचा मृत्यू
माथेरान - माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेल्या डोंबिवलीच्या एका ज्येष्ठ महिलेने घोड्यावरून सफर करताना अचानक छत्री उघडली आणि अनर्थ घडला. बिथरलेला घोडा मागे सरकून महिलेसह नजीकच्या नाल्यात पडला. नाल्यातील जलवाहिनीची लोखंडी चावी पोटात घुसून घोडा जागीच गतप्राण झाला. घोड्याखाली दबलेल्या महिलेला घोडेवाल्यांनी महत्प्रयासाने बाहेर काढून उपचारांसाठी डॉक्‍टरकडे नेले.

सलग सुट्यांमुळे कुटुंबासह फिरण्याचा बेत आखला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याबरोबरच समुद्रकिनाऱ्यांवरही जाणार आहोत. पावसाने जोरदार सुरुवात केल्याने खूप आनंद झाला आहे. मनसोक्त पावसाचा आनंद घेत आहोत.
- संदीप बनकर, पर्यटक, मुंबई

Web Title: pali konkan news tourism place blossom by rain