गावरान भाज्या सकस अन्‌ स्वस्तही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

रायगड जिल्ह्यात आवक वाढली; आदिवासींना रोजगार

रायगड जिल्ह्यात आवक वाढली; आदिवासींना रोजगार
पाली - पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात अनेक आदिवासी वाड्या-पाड्यांवरील आदिवासी परसात आणि डोंगरउतार व रानमाळावर विविध गावरान भाज्यांची लागवड करतात. सध्या या भाज्यांचे भरघोस उत्पादन आले आहे. सकस, रुचकर आणि आरोग्यवर्धक भाज्यांना चांगली मागणी आहे. भाज्या विकून आदिवासी महिलांच्या हाती चार पैसे पडत आहेत.

आदिवासींबरोबर काही शेतकरीही या भाज्यांची लागवड करतात. सध्या बाजारात शिराळे, घोसाळे, कार्ली, माठ, पडवळ, वांगी, भेंडी, काकडी, दुधी, अळूची पाने, गवार, वड्यांची पाने, ठाकरी मिरच्या अशा गावरान भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अगदी दहा रुपये जुडी, वाटा किंवा पाव किलो इतक्‍या स्वस्त दरात या भाज्या मिळतात. कोणतीही रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर न करता सेंद्रिय खतांवर तयार झालेल्या या भाज्यांना मागणी आहे. या भाज्यांचा हा हंगाम दिवाळीनंतरही सुरू असतो.

गावरान भाज्या खाण्यास खूप चविष्ट असतात. त्या सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या असल्याने आरोग्यास उत्तम असतात. यातील गावठी गवार, लांबडी वांगी आणि ठाकरी मिरच्या आवर्जून आणतो. अळूच्या आणि वड्यांच्या पानांच्या वड्या घरातील मंडळी चवीने खातात.
- ज्योती पोवळे, गृहिणी.

Web Title: pali konkan news vegetable cheap