esakal | Pali : हाती आलेले उभे भाताचे पीक झाले आडवे
sakal

बोलून बातमी शोधा

पाली, वादळी व मुसळधार पावसामुळे आडवे पडलेले भात पीक.

पाली : हाती आलेले उभे भाताचे पीक झाले आडवे,

sakal_logo
By
अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : जिल्ह्यात सर्वत्र भाताचे पिक भरघोस आले आहे. मात्र परतीच्या मुसळधार व वादळी पावसामूळे अनेक ठिकाणी भात शेतीचे नुकसान झाले आहे. मंगळवारी (ता.5) जिल्ह्यात वारा व विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे भाताची उभी पिके पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी भाताची रोपे जमिनीवर पडली. भारतीय हवामान खात्याने पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून सतर्कतेचा इशारा दिला असल्याने शेतकरी पुरते धास्तावले आहेत.

पावसामुळे काढणीला आलेला भात व काढून ठेवलेला भात याचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. सर्व पंचनामे झाल्यानंतर एकूण नुकसानीची आकडेवारी मिळेल अशी माहिती कृषी उपसंचालक रायगड जिल्हा दत्तात्रेय कळभोर यांनी सकाळला दिली.

हेही वाचा: NCBला रेव्ह पार्टीची माहिती देण्यासाठी गेलो होतो: भानुशाली

परतीच्या वादळी पावसामुळे सुधागड, रोहा, माणगाव, कर्जत, खालापूर, महाड, श्रीवर्धन, पेण, अलिबाग आदी सर्वच तालुक्यात शेतीचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने व भात अडवा पडल्याने भाताला मोड येऊन तो खराब होण्याची शक्यता आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सुधागड तालुक्यातील शेतकरी शरद गोळे म्हणाले की आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यात वादळी व मुसळधार पाऊस कोसळल्याने अस्मानी संकट आले आहे. त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.

"पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी कापणी करावी. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून विम्याचा लाभ घेता येईल. जिथे जिथे नुकसान होते तिथे 24 तासांच्या आत पंचनामे करण्याचे काम सुरू होते."

- दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड

loading image
go to top