श्रीकालकाई खेळ्यांचे ‘सावित्रीशी ’ अतूट नाते

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मार्च 2019

मंडणगड - दुसर्‍या होळीला श्रीकालकाई देवीला गार्‍हाणे घालत देवीची मान्यता प्राप्त करून पालखी गाव भेटींसाठी निघाली. प्रथेनुसार आजही पालखीचे खेळी सावित्री खाडीलगतच्या मंडणगड, महाड, म्हसळा तालुक्यातील गावांचा शेकडो किमीचा प्रवास अनवाणीच करतात.

मंडणगड - दुसर्‍या होळीला श्रीकालकाई देवीला गार्‍हाणे घालत देवीची मान्यता प्राप्त करून पालखी गाव भेटींसाठी निघाली. प्रथेनुसार आजही पालखीचे खेळी सावित्री खाडीलगतच्या मंडणगड, महाड, म्हसळा तालुक्यातील गावांचा शेकडो किमीचा प्रवास अनवाणीच करतात. या प्रवासात सावित्री नदी सोबत करीत असल्याने श्रीकालकाई आणि सावित्रीचे अतूट नाते निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी विजेरीच्या प्रकाशात काढण्यात येणारी मानाची शरणे पाहणे अद्भूत असते.

आठ दिवसांच्या प्रवासात रातांबेवाडी, घोसाळे, पंदेरी, पेवे गावठाण, पेवे कोंड, उंबशेत, खारीवाडी, पडवे, लोकरवन, म्हाप्रल बंदरवाडी, आंबेत, कोकरे, रिंगीचा कोंड, दाभोळ, सापे, टोळ, भांडीवली, केस्तुली, नांदवी, फळांनी, कृष्णनगरी, कासारमल, सोनघर, खामगाव, गावळवाडी, कणघर, मोरवणे, पास्टी , गावळवडी, मंदाटने, आमशेत, निगडी, घुमरी या गावांतून पालखीचा प्रवास झाला आहे. अनेक ठिकाणी मानाच्या गोड जेवणावळी झाल्या. पालखीचे 19 मार्चला सावरी गाव, तेलेवाडी, केळेवाडी पंचक्रोशीतील गावांच्या भेटीनंतर संध्याकाळी माळरानाच्या वेशीवर आसावले गावात आगमन होणार आहे.

आगमनाच्या दिवशी ढोल ताशाच्या गजरात, लेझीम नृत्याने जल्लोषात पालखीचे स्वागत होणार आहे. 20 मार्चला होम पेटवल्यांतर गावातून घरोघरी पालखी फिरवण्यात येणार असून मानाची शरणे रात्रीची काढण्यात येणार आहेत. रात्रभर देवीला खांद्यावर अगदी थकेपर्यंत नाचवल्यांतर मनोरंजनाचे कार्यक्रम होतील. त्यानंतर पालखी पहाटे मंदिरात स्थानापन्न होईल. रात्री गावाच्या सीमेपासून होळीपर्यंत वेल ओढण्याचा खेळ खेळण्याची परंपरा आजही जोपासली जात आहे.

“शिमगा सुरू झाल्यानंतर अनेक गावांतून फोन करून पालखी कधी येणार याची विचारणा केली जाते. यावर्षी आसावले आगमनाच्या दिवशी ग्रामस्थ, महिला, मुले एक रंगाची वेशभूषा परिधान करून आणि लेझीम नृत्याने जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. हे क्षण अनुभवण्यासाठी मुंबईकर आवर्जून उपस्थित राहतो.”

- अनंत काप, अध्यक्ष मुंबई मंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palkhi holi festival in Konkan