पणदूर ते कुडाळपर्यंत खड्डयांचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

पणदूर : मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर पुलापासून ते कुडाळ भंगसाळ नदी पुलापर्यंत जीवघेणे खड्डे पडले आहेत. ते सध्या अपघातांना निमंत्रण देत आहेत. या खड्डयांमुळे किरकोळ अपघाताच्या घटना नेहमीच घडत असून, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारक व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
महामार्गावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. मागील आठवड्यात अशा खड्डयांमुळे बिबवणे येथे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असूनही महामार्गावर संबंधित खात्याचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. कुडाळपासून जवळच असलेल्या भंगसाळ पुलाच्या दोन्ही बाजूंना घातलेल्या गतिरोधकांच्या शेजारी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. याचा प्रवाशांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावशी ते पणदूर पुलापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने अपघात घडत आहेत.
वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे खड्डे वाढत आहेत. त्यातही अधिक खड्डे पुलाच्या दोन्ही बाजूंना पडलेले आहेत. वेताळबांबर्डे पुलाच्या वळणावर जीवघेणे खड्डयांचे साम्राज्य पसरलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे लोकांमधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. काही ठिकाणी रस्त्यालगत असलेली मोठी झाडेसुद्धा धोकादायक बनत आहे. ती केव्हा पडतील, याची शाश्‍वती नाही. तरी महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी धोकादायक खड्डे व झाडांची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.

Web Title: Panadur to kudala podholes Empire