मंडणगडात चिठ्ठीने उघडले सेनेचे भाग्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मंडणगड - राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा मिळाल्याने सभापती निवडीचा कौल शिवसेनेच्या बाजूने लागला. त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. समान सदस्यांमुळे शिवसैनिकांना आजचा चिठ्ठीचा कौल दिलासा देणारा ठरला. या निकालामुळे आगामी अडीच वर्षांत मंडणगड पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व राहणार आहे. 

सभापती व उपसभापती निवडीसाठी पंचायत समितीमध्ये आज तहसील कार्यालयाने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये सभापतिपदासाठी आदेश केणे व नितीन म्हामुणकर यांनी पिठासीन अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. उपसभापतिपदासाठी सौ. स्नेहल सकपाळ व सौ. प्रणाली चिले यांनी पिठासीन अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. समान संख्याबळामुळे या दोन्ही पदांचा निकाल चिठ्ठीच्या आधारे लागणार, हे स्पष्ट होते. दुपारी दोननंतर निवडीचे प्रक्रियेला सुरवात झाली. चारही सदस्यांसह गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, तहसीलदार प्रशांत पानवेकर, नायब तहसीलदार विकास गारुडकर उपस्थित होते. भिंगळोली शाळेतील श्रवण श्रीकांत स्वामी या विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रथम सभापतिपदासाठी चिठ्ठी काढण्यात आली. या चिठ्ठीचा कौल सेनेचे आदेश केणे यांचे बाजूने लागल्याने पंचायत समितीचे आवारात जमलेल्या शिवसैनिकांनी ‘वाघ आला रे वाघ आला, शिवसेनेचा वाघ आला’, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. 

उपसभापतीचे निवडीची चिठ्ठी भिंगळोली शाळेतील आकांक्षा पवार हिने काढली. या चिठ्ठीवर सेनेच्या सौ. स्नेहल सकपाळ यांचे नाव असल्याने सभापतिपदानंतर नशिबाने दिलेल्या कौलामुळे उपसभापतिपदाची लॉटरी ही शिवसेनेस लागली. यानंतर शिवसैनिकांनी फटाक्‍याच्या आतषबाजीने विजयाचा आनंद साजरा केला.

Web Title: panchyat committee chairman selection