खवले मांजर संरक्षण प्रकल्प भारतात राबवणार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 June 2019

चिपळूण - खवले मांजराची तस्करी रोखण्यासाठी तसेच या दुर्मिळ प्राण्याला संरक्षण मिळावे, यासाठी सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. अजून खूप मोठ्ठा पल्ला गाठायचा आहे. हा प्रकल्प भारतात राबवणार असल्याची माहिती निसर्गमित्र भाऊ काटदरे यांनी दिली. 

चिपळूण - खवले मांजराची तस्करी रोखण्यासाठी तसेच या दुर्मिळ प्राण्याला संरक्षण मिळावे, यासाठी सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. अजून खूप मोठ्ठा पल्ला गाठायचा आहे. हा प्रकल्प भारतात राबवणार असल्याची माहिती निसर्गमित्र भाऊ काटदरे यांनी दिली. 

ते म्हणाले, ‘‘डिसेंबर २०१५ पासून आम्ही खवले मांजर संरक्षण संवर्धनाचे काम हाती घेतले. सुरवातीला चिपळूण तालुक्‍यातील १६४ गावांत फिरून लोकांना विचारून माहिती गोळा केली. त्या माहितीच्या आधारे ट्रॅप कॅमेरा सर्वेक्षण चालू केले व दिवसा रात्री प्रत्यक्ष फिरून सर्वेक्षण केले.

तालुक्‍यातील १६४ गावांतील सरपंच, पोलिसपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांची कार्यशाळा घेऊन त्यांना खवले मांजराचे महत्त्व पटवून दिले व संरक्षण संवर्धनाचे आवाहन केले. त्यांच्या शिकारीत गुंतलेल्या कातकरी आदिवासी लोकांसाठी विशेष कार्यशाळा घेतली. त्यांच्यासाठी आम्ही मधमाशीपालन, जंगल संपत्ती गोळा करणे, पर्यटन मार्गदर्शन व होम स्टे इत्यादी विविध रोजीरोटीच्या संधी उपलब्ध करून देत आहोत.

शाळा महाविद्यालये येथे विविध कार्यक्रम आयोजित केले. संपूर्ण तालुक्‍यात महत्त्वाच्या ठिकाणी खवले मांजर वाचवा असे मोठे बोर्ड लावले, गावागावांत पत्रके वाटली. वनविभागाच्या सहकार्याने चिपळूण तालुक्‍यात हे काम यशस्वी होत आहे. चिपळूण तालुक्‍यातील काम आम्ही संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात विस्तृतपणे अधिक मोठ्या प्रमाणात करू लागलो. शालेय शिक्षण विभागाच्या इयत्ता सातवीच्या इंग्रजीच्या पुस्तकात मी लिहिलेला खवले मांजराचा धडा प्रसिद्ध झाल्यामुळे दरवर्षी १७ लाख मुलांपर्यंत ही माहिती पोचत आहे. त्याच धड्यातील गोष्टीचे मराठीत पुस्तक वनविभागाच्या सहकार्याने काढून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना मोफत वितरित करण्यात आले. 

...तरच मोहीम यशस्वी
यावर्षी ११ ठिकाणी खवले मांजर धोक्‍यात असताना स्थानिक लोकांनी त्याला वाचवले, वनविभागाच्या ताब्यात दिले किंवा त्वरित जंगलात सोडून दिले. लोक स्वतःहून पुढे येऊन लोकांना खवले मांजराच्या संरक्षणाचे महत्त्व सांगत आहेत. एखाद्या आडगावात संध्याकाळी खवले मांजर निवांतपणे फिरताना दिसेल तेव्हाच खऱ्या अर्थाने खवले मांजर संरक्षण मोहीम यशस्वी होईल, असे काटदरे यानी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pangolin protection project to be implemented in India