बापरे ! यासाठी होते खवले मांजराची तस्करी; तिघे जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 December 2019

काही दिवसांपुर्वी बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी गेलेल्या आर्चिणे आणि घोणसरी येथील दोन तरूणांना ठाणे परिसरात वनविभागाने अटक केली होती. या कारवाईची घटना ताजी असतानाच आता कोल्हापुर वनविभागाने खवले मांजर विक्रीसाठी नेणाऱ्या मांगवलीतील दोघांना अटक केली आहे.

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - जिवंत खवले मांजराची विक्री करण्यासाठी गगनबावडा येथे गेलेल्या तिघांना कोल्हापुर वनविभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (ता. 20) करण्यात आली. पकडलेल्यामध्ये मांगवलीतील दोघांचा तर सांगलीतील एकाचा समावेश आहे. संशयितांच्या घराची झडती घेतली असता अधिकाऱ्यांना एक विनापरवाना बंदुक आढळुन आली. तिघांनाही न्यायालयाने सहा दिवसांची कोठडी सुनावली. 

अनिकेत अकुंश संसारे (वय 22), नितीन अनंत रामाणे (वय 23, दोन्ही रा.मांगवली), रमेश आनंदा खामकर (वय 35, रा.इटकरे, जि. सांगली) अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गगनबावडा येथे खवले मांजर घेवुन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कोल्हापुर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या आधारे फिरत्या पथकाचे प्रमुख युवराज पाटील, वनरक्षक सागर पटकारे, सांगलीचे वनपाल एस. व्ही. पारधी, वनरक्षक बाबु कोळी यांनी 20 डिसेंबरला गगनबावडा येथे सापळा रचला होता.

हेही वाचा - अरे ! ही लग्न पत्रिका ? नव्हे ही तर राष्ट्रवादीची.... 

दहा लाख रुपये किमतीला विक्रीचे प्रयत्न

सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास या पथकाला बसस्थानक परिसरात तिघेजण घुटमळताना दिसले. क्षणाचाही विलंब न लावता पथकाने या तिघांना ताब्यात घेवुन झडती घेतली असता त्यांच्याकडे त्यांच्याकडील पिशवीत जिवंत खवले मांजर आढळले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खवले मांजर विक्रीसाठी आणल्याचे कबुल केले. दहा लाख रूपये किमंतीला ते मांजर विकणार असल्याचेही त्यांनी मान्य केले. 

संसारे यांच्या घरी विनापरवाना बंदुक

पकडण्यात आलेल्यामध्ये मांगवली येथील अनिकेत संसारे आणि नितीन रामाणे यांचा समावेश असल्यामुळे ही माहीती सिंधुदुर्ग वनविभागाला दिली. सावंतवाडीचे उपवनसंरक्षक रमेश कांबळे यांच्या सुचनेनुसार वनपाल सदाशिव वागरे, वनरक्षक किरण पाटील, अमिन काकतीकर हे गगनबावडा येथे पोचले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मांगवली येथे दोन्ही संशयितांच्या घराची झडती घेतली असता श्री. संसारे यांच्या घरात एक विनापरवाना बंदुक आढळुन आली. ही बंदुक वनविभागाने जप्त केली आहे. वनविभागाने तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे का? याचा तपास वनविभाग करीत आहे. 

हेही वाचा - धक्कादायक ! शिक्षिकेने आवळला विद्यार्थ्यांचा गळा​ ? 

महिनाभरातील दुसरी कारवाई 

काही दिवसांपुर्वी बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी गेलेल्या आर्चिणे आणि घोणसरी येथील दोन तरूणांना ठाणे परिसरात वनविभागाने अटक केली होती. या कारवाईची घटना ताजी असतानाच आता कोल्हापुर वनविभागाने खवले मांजर विक्रीसाठी नेणाऱ्या मांगवलीतील दोघांना अटक केली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची तस्करी करणारे रॅकेट असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

काळ्या जादुसाठी खवले मांजरांचा वापर 

वनविभागाने पकडले खवले मांजर दहा लाख रूपये किंमतीला विक्री करण्यात येणार होते. मांजरांची तस्करी वेगवेगळ्या कारणांसाठी केली जाते. 40 ते 50 हजार रूपयाला खवल्यांची विक्री होते तर काळ्या जादुसाठी मोठी किंमत मोजली जाते. ज्याअर्थी या मांजरासाठी दहा लाख रूपये मोजले जाणार होते. त्याअर्थी हे मांजर काळ्या जादुसाठीच नेले जात असण्याची शक्‍यता अधिक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pangolins Smuggling For Black Magic Sindhudurg Marathi News