सावधान! पन्हळे धरणाच्या भेगांचा आकार वाढतोय

सकाळ वृत्तसेवा | Sunday, 29 November 2020

धरणाची गळती थांबली असली तरी धरणाला भेगा पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

लांजा (रत्नागिरी) : तालुक्‍यातील पन्हळे येथील २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या लघू धरणाला गत महिन्यात गळती सुरू झाली होती. धरणाची गळती थांबली असली तरी धरणाला भेगा पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पावसाळ्यात पडलेल्या भेगांचा आकार वाढत असतानाच धरणाच्या इतर भागाला भेगा पडत असल्याने धरणाचे काम लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी पन्हळे ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे.  

पन्हळे येथील लघू धरणाला गळती सुरू झाल्याने खडबडून जागे झालेल्या पाटबंधारे विभागाकडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पाटबंधारे कार्यकारी अधिकारी अभियंता यांनी धरणाला कोणताही धोका नसल्याचा दावा केला. गळती थांबली असली तरी धरणाला भेगा पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धरणाची पाहणी करून पंचायत समिती सदस्य अनिल कसबले यांनी भेगा निदर्शनास आणून दिल्या.

हेही वाचा -  

Advertising
Advertising

पावसाळ्यात पडलेल्या भेगांचा आकार वाढत असून धरणाच्या इतर भागाला भेगा पडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ चिंता व्यक्त करत आहेत. गत महिन्यामध्ये परतीच्या पावसामध्ये धरणाच्या मध्यभागी रात्री धरणाच्या खालील भागातून गढूळ पाण्याची गळती झाली होती. धरणातून गढूळ पाणी सुरू झाल्याचे जोशी गुरववाडीतील ग्रामस्थांना समजले. त्यानंतर सरपंच सौ. मसणे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना याची माहिती दिली होती. त्यानंतर तातडीने कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, शाखा अभियंता संजय नलावडे हे घटनास्थळी दाखल झाले.

पाटबंधारे विभागाचे तंत्रज्ञानी पाहणी केली होती. धरणात ३.४४ द. घ. मीटर पाणीसाठा पावसाने झाला होता. पाणीदाबामुळे धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये, यासाठी पाण्याचा विसर्ग केला होता. कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की, या धरणाला गेली पाच वर्षे लिकेज आहे; मात्र दुरुस्ती होत असते. या धरणाच्या डागडुजीसाठी १ कोटी रुपयाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे; मात्र काम केव्हा सुरू होणार, याकडे पन्हळेवासीयांचे लक्ष लागले आहे.

ग्रामस्थांनी केली पाहणी

धरणाला पावसाळ्यात पडलेल्या भेगांचा आकार वाढत असून धरणाच्या अन्य भागातही तडे गेले आहेत. धरणाची ग्रामस्थांनी पाहणी केली असून धरणाला जाणाऱ्या भेगांमुळे चिंता व्यक्त केली आहे. अनिल कसबले यांनी व ग्रामस्थांनी धरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा - कोरोना रिपोर्ट आधीच शाळा सुरू केल्याने खळबळ

 

संपादन - स्नेहल कदम