नोटिशीविना इमारत पाडल्यास रस्त्यावर उतरण्याचा पारकर यांचा इशारा

नोटिशीविना इमारत पाडल्यास रस्त्यावर उतरण्याचा पारकर यांचा इशारा

कणकवली - शहरातील महाडिक बिल्डिंगमधील प्रत्येक गाळेधारकाला तसेच अडीच गुंठे जमीन मालकाला मूल्यांकनासह भूसंपादनाची तसेच मालमत्ता संपादनाची कायदेशीर नोटीस दिल्यानंतरच ही बिल्डिंग पाडा; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. पोलिस संरक्षण घेऊन चुकीच्या पद्धतीने काम केल्यास शहरवासीय सहन करणार नाहीत, असा इशारा भाजपचे नेते संदेश पारकर यांनी महसूल तसेच महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना येथे दिला.

ही इमारत पोलिस संरक्षणात तोडण्याची तयारी प्रशासनाने केली होती. या पार्श्‍वभूमीवर श्री. पारकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयाला धडक दिली. प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते रत्नागिरी येथे निवडणुकीच्या कामानिमित्त गेले होते. त्यामुळे तेथे महामार्गच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. नायब तहसीलदार आर. जे. पवार, सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता भातूस्कर तसेच महाडिक व गाळेधारक नितीन नाईक आदींच्या उपस्थितीत चर्चा झाली. यावेळी श्री. पारकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. 

पारकर म्हणाले, ‘‘या महामार्गाच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण अरुंद रस्ता, सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी, अर्धवट स्थितीतील बांधकामे, रखडलेले गटाराचे काम याकडे दुर्लक्ष करुन महामार्ग प्राधिकरण रस्ता पूर्ण करण्यासाठी मालमत्ताधारकांनावर जबरदस्ती करत आहे. त्याला पोलिस संरक्षण देत आहेत, हे हास्यास्पद आहे. मुळात महाडिक बिल्डिंग ज्या जागेमध्ये आहे, त्या अडीच गुंठे जमिनीचे मूल्यांकन झालेले नाही. तसेच इमारत तळमजला अधिक दोन मजले या पद्धतीने उभी आहे. 

शहरातील रस्ता रुंदीकरणामुळे अनेक जण उद्‌ध्वस्त होत आहेत. भूसंपादनाचा शहरातील व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून अनेक व्यावसायिकांवर अन्याय सुरू आहे. वाहनचालकांनाही वाहने थांबवण्यासाठी पर्यायी जागा नाही. कोणाचेही पुनर्वसन झालेले नाही. ही बळजबरी कणकवलीकरांनी का सहन करावी? महामार्गाच्या चुकीच्या कामावर आपण लक्ष देऊ. कोणावर अन्याय होऊ देणार नाही.
- संदेश पारकर, माजी नगराध्यक्ष, कणकवली

या इमारतीतील सर्व गाळे हे नगरपंचायत इकडे असेसमेंट झालेले आहेत. सर्व बाबी अधिकृत असताना कोणतेही मूल्यांकन न करता इमारत पोलिस संरक्षणात काढून टाकण्याची भूमिका राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे, ती चुकीची आहे. जोपर्यंत नोटस दिली जात नाही, तोपर्यंत इमारत पडू दिली जाणार नाही. नोटीस द्या, आम्ही स्वतःहून इमारत खाली करून देतो. पोलिस संरक्षणाची काय गरज.

कणकवलीत ज्या, ज्या इमारती अडसर ठरत होत्या. त्या मी स्वतःहून काढून दिल्या; मात्र अशा लोकांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही. महामार्ग पूर्ण व्हावा, ही सगळ्यांची इच्छा आहे; पण शहरवासीयांना उद्‌ध्वस्त करून महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर काम करू इच्छित असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com