शिक्षक समायोजनात कोट्यवधीचा भ्रष्टाचार - परशुराम उपरकर

शिक्षक समायोजनात कोट्यवधीचा भ्रष्टाचार - परशुराम उपरकर

कणकवली - सिंधुदुर्गातील माध्यमिक शाळा, हायस्कूलमधील शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. ज्यांनी कधीही अध्यापनासाठी शाळेची पायरी चढली नाही अशांना नवीन शिक्षक नियुक्‍त्या आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाला हाताशी धरून अनेक संस्थांनी आपल्या शाळांतील सिनिअर शिक्षकांना अतिरिक्‍त ठरवून नारळ दिला आहे व ज्युनिअर शिक्षकांना सेवेत कायम केले आहे, असा आरोप मनसेचे प्रदेश चिटणीस परशुराम उपरकर यांनी आज केला. 

श्री. उपरकर यांनी येथील मनसे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.

उपरकर म्हणाले, ""विद्यार्थी पटसंख्येच्या निकषांमुळे अनेक माध्यमिक शाळांतील शिक्षक अतिरिक्‍त ठरले. या शिक्षकांना अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला; मात्र हे समायोजन करताना अनेक शैक्षणिक संस्थांनी आपली पोळी भाजून घेतली. यात जे कधी त्या शाळेत शिक्षक नव्हतेच ते 2012 पूर्वीपासून संस्थेत कार्यरत आहेत असे दाखवून त्यांना नियुक्‍त्या दिल्या. तर अनेक शिक्षण संस्थांनी सिनिअर शिक्षकांना अतिरिक्‍त ठरवून ज्युनिअर शिक्षकांच्या नियुक्‍त्या कायम केल्या. या सर्व प्रक्रियेत कोट्यवधीचा गैरव्यवहार झाला आहे.'' 

ते म्हणाले, ""शिक्षक भरतीसाठी डी.एड, बी.एड. धारकांनी नोंदणी केली आहे. रीतसर जाहिरात देऊन शिक्षक भरती करावी लागते; परंतु 11 जानेवारीला झालेल्या समायोजन प्रक्रियेत, अशी कोणतीही प्रक्रिया राबविली नाही. माध्यमिक शिक्षण विभाग आणि काही शैक्षणिक संस्थांनी संगनमत करून हा प्रकार केला आहे. दोडामार्ग तालुक्‍यातच असे 9 शिक्षक नियुक्‍त केले आहेत. इतर तालुक्‍यातही असाच प्रकार झाला असण्याची शक्‍यता आहे. शिक्षण विभागाकडील नोंदीनुसार जे शिक्षक अतिरिक्‍त ठरले त्यांना नोटिसा बजावतानाही गैरव्यवहार झाला आहे. ज्यांची बदली करण्याचे आदेश पूर्वी निघाले होते त्या आदेशातील शिक्षकांनी नावे आर्थिक तडजोड करून बदलण्यात आली. त्याचा फटका अनेक सिनिअर शिक्षकांना बसला असून ते अतिरिक्‍त ठरत आहेत. या सर्व गैरप्रकारांबाबत शिक्षण उपसंचालक आणि राज्याच्या प्रधान सचिवांकडे आम्ही तक्रार केली आहे. यात अतिरिक्‍त ठरलेल्या शिक्षकांना न्याय न मिळाल्यास मनसेतर्फे आंदोलन छेडणार आहे.'' 

शासन अध्यादेश 2013 नुसार दरवर्षी शिक्षकांचे रोस्टर भरून घेणे आवश्‍यक आहे. तसेच बिंदू नामावली तयार करून शिक्षकांची सेवा ज्येष्ठता व इतर माहिती अपडेट ठेवायची आहे. पण अनेक शिक्षकांनी रोस्टर आणि बिंदूनामावलीचे तयार केलेली नाही. त्यामुळे अनेक ज्युनिअर शिक्षक सेवेत कायम राहिले तर सिनिअर शिक्षकांना अन्य शाळा, हायस्कूल शोधण्याची वेळ आल्याची माहिती उपरकर यांनी दिली. 

दोडामार्गात 9 शिक्षक नव्याने सेवेत 
समायोजन प्रक्रियेत दोडामार्ग तालुक्‍यात 9 शिक्षक पूर्वी कार्यरत होते असे दाखवून त्यांना नियुक्‍ती दिली आहे. इतर तालुक्‍यातही असाच प्रकार झाल्याची शक्‍यता असून, त्याबाबतची माहिती शिक्षण विभाग आणि संबंधित संस्था चालकांकडून मागविल्याची माहिती उपरकर यांनी दिली. 

"ती' महिला कर्मचारी घोटाळ्याची सूत्रधार 
शिक्षण विभागात गेली वीस वर्षे एकाच टेबलवर एक महिला कर्मचारी कार्यरत आहे. हीच महिला समायोजनाच्या माध्यमातून जो घोटाळा झाला त्याची सूत्रधार आहे. एखादा कर्मचारी 20 वर्षे एकाच टेबलवर कसा काय राहू शकतो असेही उपरकर म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com