महाड एसटी आगरात संपामुळे प्रवाशांची गैरसोय

सुनील पाटकर
शुक्रवार, 8 जून 2018

आज सकाळी महाड आगरातून सात बसेस सोडण्यात आल्या असून बाहेर गावातून तसेच वस्तीला गेलेल्या सर्व बसेस आगरांमध्ये सुखरुप पोहोचल्या असल्याची माहिती महाड आगराचे व्यवस्थापक ए.पी.कुलकर्णी यांनी दिली.

महाड : मध्यरात्रीपासून महाड एसटी आगरांतील सर्व कर्मचाऱ्यांनी अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने आगरांतील प्रवासी बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे स्थानकावर आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली तर खाजगी वाहनांना चांगलाच फायदा झाला.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अघोषित संप पुकारल्यानंतर महाड आगरातील बहुतांशी सर्व कर्मचारी संपावर गेले आहेंत. अचानक पुकारण्यात आलेल्या संपामुळे असंख्य प्रवाशांची गैरसोय झाली असून प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाड आगरांमध्ये सुमारे 350 कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्याने महाड आगरांतील प्रवासी सेवा ठप्प झाली. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी देण्यांत यावी, जोपर्यत कामगार, कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यत कर्मचारी आणि कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यांत आला असल्याचे महाड आगरातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आगरातील सर्व कर्मचारी संपावर असलेतरी तांत्रिक आणि कार्यालयीन कर्मचारी कामावर असल्याचे दिसून आले. या संपामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांची मदत घ्यावी लागली. या संधीचा फायदा घेत खाजगी वाहनचालकांनी मनाला वाटेल ते दर आकारुन प्रवाशांना वेठीस धरले. 

आज सकाळी महाड आगरातून सात बसेस सोडण्यात आल्या असून बाहेर गावातून तसेच वस्तीला गेलेल्या सर्व बसेस आगरांमध्ये सुखरुप पोहोचल्या असल्याची माहिती महाड आगराचे व्यवस्थापक ए.पी.कुलकर्णी यांनी दिली.

Web Title: passengers faces huge problems due to agitation in Mahad ST