डॉक्‍टरांसाठी रुग्ण हा पैसे कमविण्याचे साधन - डॉ. अनिल अवचट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

महाड - कंपन्यांकडून दाखवल्या जाणाऱ्या प्रलोभनांमुळे रुग्ण हा आता डॉक्‍टरांसाठी पैसे कमविण्याचे साधन झाला आहे. समाजाचे स्वास्थ्य सांभाळण्याचे काम पूर्वी फॅमिली डॉक्‍टर करत असत; परंतु आता ते स्वास्थ्य समाज गमावून बसला आहे. वैद्यकीय व्यवसायातील दिवसेंदिवस वाढत जाणारा भ्रष्टाचार त्याला कारणीभूत आहे. ही अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे, अशी खंत "मुक्तांगण'चे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली. 

महाड येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांचा षष्ठ्याब्दीपूर्ती सोहळा शुक्रवारी (ता. 19) सायंकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झाला. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर "चला घडवू या मुलांना'चे प्रणेते बालरोगतज्ज्ञ डॉ चंद्रशेखर दाभाडकर, त्यांच्या पत्नी डॉ. सुजाता दाभाडकर, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी, महाड अर्बन बॅंकेच्या अध्यक्षा शोभा सावंत, ऍड्‌. प्रसाद पाटील, डॉ. आबासाहेब पाटणकर आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. दाभाडकर यांचा डॉ. अवचट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

डॉ. अवचट यांनी वैद्यकीय व्यावसायिकांतील अपप्रवृत्तींवर टीकेची झोड उठवली. डॉक्‍टर व औषध वितरक यांचे साटेलोटे असतात. डॉक्‍टरांना औषध कंपन्यांकडून, तसेच औषध वितरकांकडून मोठी कमिशन व परदेश दौऱ्यांसारखी प्रलोभने दाखवली जातात. त्याला वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर बळी पडतात. त्याचा फटका मात्र सामान्य रुग्णांना बसतो. त्यामुळे रुग्ण हा आता पैसे कमविण्याचे साधन झाला आहे. याला आळा घातला पाहिजे, असे ते म्हणाले. 

रुग्णाशी संवाद साधणारे, विनोद करणारे थोडेच डॉक्‍टर बाकी आहेत. त्यात डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांचे नाव घ्यावे लागेल, असे गौरवोद्‌गार अवचट यांनी काढले. या वेळी विविध वक्‍त्यांनी डॉ. दाभाडकर यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. दाभाडकर हे महाडमध्ये 30 वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. त्यांनी "चला घडवू या मुलांना' या व्याख्यानमालेद्वारे राज्यभर पालक व मुलांमध्ये जागरुकता निर्माण केली, तसेच या विषयावर विपूल लिखाणही केले आहे. 

Web Title: The patient is the means of making money for the doctor