फासकीतील बिबट्याची सुटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील कुर्धे येथील एका आंबा बागेजवळ लावण्यात आलेल्या फासकीत बिबट्या अडकला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची सुटका करून त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हा बिबट्या सहा वर्षांचा असून नर जातीचा आहे.

कुर्धे येथील खोताची वाडी येथील कराराने देण्यात आलेल्या आंबा बागेजवळ पाणदळीतील फासकीत हा बिबट्या अडकला होता. भक्ष्याच्या शोधात फिरत असताना लावलेल्या फासकीत बिबट्या रात्री अडकला असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास बागेत गुरखा फिरत होता. त्याला दुसऱ्या गुरख्याने हाक मारल्याने तो जात असताना बिबट्याने डरकाळी फोडली. त्या वेळी फासकीत बिबट्या अडकल्याचे त्याला समजले. गुरख्याने मालकाला बिबट्या अडकल्याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी पिंजऱ्यासह दाखल झाले आणि त्यांनी बिबट्याला फासकीतून सोडवून पिंजऱ्यात जेरबंद केले.

दुपारनंतर वन खात्याचे अधिकारी पिंजरा घेऊन रवाना झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. गेले दोन-तीन वर्षे या परिसरात बिबट्याचा सतत वावर होता. अनेक गुरे, कुत्रे त्याने फस्त केले आहेत. यामुळे ग्रामस्थ भयभीत होते. तीन वेळा ग्रामस्थांवरही हल्ला झाला होता. एकदा बिबट्याने विहिरीतून पलायन केले होते. त्यामुळे भीतीचे वातावरण कायम होते. मात्र, आज बिबट्याचा बंदोबस्त झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: pavas konkan news leopard