पाझर तलाव धोकादायक; सिद्धेश्वर गावावर टांगती तलवार

अमित गवळे
मंगळवार, 16 जुलै 2019

पाली : सुधागड तालुक्यातील सिद्धेश्ववर (बुद्रुक) गावातील मोठ्या पाझर तलावाची दुरवस्था झाली असून तो धोकादायक झाला आहे. तिवरे गावातील धरण दुर्घटनेप्रमाणे इथे देखील तशी दुर्घटना घडू नये यामुळे या पाझर तलावाचे स्ट्रक्चरल ऑडिट व दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केले आहे

पाली : सुधागड तालुक्यातील सिद्धेश्ववर (बुद्रुक) गावातील मोठ्या पाझर तलावाची दुरवस्था झाली असून तो धोकादायक झाला आहे. तिवरे गावातील धरण दुर्घटनेप्रमाणे इथे देखील तशी दुर्घटना घडू नये यामुळे या पाझर तलावाचे स्ट्रक्चरल ऑडिट व दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केले आहे. या संदर्भातील निवेदन सोमवारी (ता.15) सरपंच उमेश यादव व ग्रामपंचायत सदस्य योगेश सुरावकर यांनी सुधागड गटविकास अधिकारी व तहसीलदारांना दिले.
   
सिद्धेश्ववर (बुद्रुक) गावच्या वरच्या बाजूला साधारण चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या या पाझर तलावाची आजतागायत डागडुजी व दुरुस्ती झालेली नाही. पाझर तलावाच्या (धरणाच्या) विस्तीर्ण भिंतीवर मोठी झाडे वाढली आहेत. झाडे व वाढलेल्या झाडीमुळे ही भिंतच दिसत नाही. झाडांची मुळे खोलवर जाऊन भिंतींचे दगड व खालील माती निसटत आहे. तसेच काही ठिकाणी भिंतींचे दगड ढासळले आहेत. भिंतीच्या मातीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. माती वाहून गेली आहे. पाझर तलावाला काही ठिकाणी गळती लागली आहे. तसेच सध्या हा पाझर तलाव पाण्याने पूर्णपणे भरलेला आहे. असा हा कमकुवत पाझर तलाव (धरण) कधीही फुटू शकतो. त्यामुळे खाली वसलेल्या गावातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका आहे. वेळीच हा धोका ओळखून पाझर तलावाची योग्य प्रकारे दुरुस्ती झाली पाहिजे असे ग्रामपंचायत सदस्य योगेश सुरावकर यांनी सकाळला सांगितले.

ग्रामस्थांकडूनच वेळोवेळी दुरुस्ती दोन वर्षांपूर्वी या पाझर तलावाचा सांडव्याला गळती लागून तो कमकुवत झाला होता. त्यावेळी सर्व गावकरी जमा झाले आणि त्यांनी तब्बल 60 ते 70 हजार रुपये जमा करून सांडव्याची दुरुस्ती केली. असे ग्रामस्थ अनंता साळसकर यांनी सकाळला सांगितले. काही महिन्यांपूर्वी धरणाच्या भिंतींची माती जाऊन खोल खड्डा पडला होता. तोही सरपंच, सदस्य व गावकऱ्यांनी मिळून बुजविला आहे. पाझर तलावाच्या खाली असलेल्या ब्रिटीशकालीन बंधाऱ्याची दुरुस्ती देखील ग्रामपंचायतीनेच केली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाची काही जबाबदारी आहे की नाही हा प्रश्न येथील ग्रामस्थ विचारत आहेत.

''विस्तृत आणि जुना असा हा पाझर तलाव कमकुवत झाला आहे. त्यामुळे वेळीच याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्या स्वरूपाच्या मागणीचे निवेदन आम्ही गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांकडे दिले आहे. अपेक्षा आहे की यावर वेळीच कार्यवाही केली जाईल.''
- उमेश यादव, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, सिद्धेश्ववर बुद्रुक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pazar lake in in danger