जिल्हा परिषदेत टक्केवारीचे राजकारण - रवींद्र चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. टक्केवारीचे राजकारण वाढले आहे. याला चाप लावण्यासाठी काँग्रेसमुक्त जिल्हा परिषद करून भाजपला साथ द्यावी, असे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले.

कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. टक्केवारीचे राजकारण वाढले आहे. याला चाप लावण्यासाठी काँग्रेसमुक्त जिल्हा परिषद करून भाजपला साथ द्यावी, असे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले.

राज्यमंत्री श्री. चव्हाण आज तालुका दौऱ्यावर होते. येथील भाजप कार्यालयाचे उद्‌घाटन झाल्यानंतर महालक्ष्मी सभागृहात सुराज्य पर्व अंतर्गत तालुका मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी माजी जिल्हा अध्यक्ष अतुल काळसेकर, प्रवक्ते काका कुडाळकर, राजू राऊळ, संतोष शिरसाट, चारुदत्त देसाई, सर्फराज नाईक, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, प्रभाकर सावंत, महेश गवस, दादा बेळणेकर, गजानन वेंगुर्लेकर, उषा आठल्ये, विजय कांबळी, देवेंद्र सामंत, नारायण शृंगारे, राजेश पडदे, सदा अणावकर, आनंद सावंत, बंड्या सावंत, वैभव परब, मधुरा राऊळ, तालुक्‍यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या कालावधीत जिल्हा परिषदेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. टक्केवारीचे राजकारण वाढले आहे. त्याला आळा घालून जिल्हा परिषदेला काँग्रेसमुक्त करणे काळाची गरज आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी विविध कल्याणकारी योजना आल्या आहेत. सुराज्य पर्वाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत जाणे गरजेचे आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये अन्य कोणालाही पाऊल टाकू न देण्याची कामगिरी कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. परिवर्तनाची लाट संपूर्ण महाराष्ट्रात  आहे.

जास्त नगराध्यक्ष, नगरसेवक भाजपचे आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत चांगले वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांची टीम सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. पाचशे, हजाराच्या नोटाबंदीने झालेल्या त्रासाबाबत इतर पक्षांनी रान पेटविले. त्याचा सर्वसामान्यांवर कोणताही परिणाम झाला नाही.’’

कुडाळ नगरपंचायतीचा पराभवाचा निकाल प्रत्येकाच्या जिव्हारी लागला होता. आता हे सर्व पेटून उठतील व यशाच्या दिशेने वाटचाल करतील, अशी मला खात्री आहे. काही जणांनी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून राजकारण केले आहे. सिंधुदुर्ग बदलला पाहिजे. राजकारण बदलले पाहिजे यासाठी भाजप हाच पर्याय आहे.’’

अतुल काळसेकर म्हणाले, ‘‘भाजप स्वबळावर निवडणूक जिंकू शकतो हे वेंगुर्ले पॅटर्नने दाखवून दिले. सर्वांनी राजकीय ताकद पुढच्या निवडणुकीत दाखवून दिली पाहिजे.’’

या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांसह ५० हून अधिकांनी भाजपत प्रवेश केला. यामध्ये सुश्‍मित बांबुळकर, वैभव जाधव, संकेत चिंदरकर, अभिषेक पालव, सिद्धिविनायक बावकर, अन्वर शेख, प्रणव पाटकर, सौरभ सडवेलकर, गणेश सावंत, नारायण सराफदार, श्रीतेज झोडगे, समीर धुरी, अभय प्रभू, ओंकार सरमळकर, आनंद तारी आदींचा समावेश होता. प्रभाकर सावंत यांनी सूत्रसंचालन केले. 

सिंधुदुर्गात झालेल्या पालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे ३४, तर शिवसेनेचे ३१ नगरसेवक आले. यामध्ये भाजप अव्वल आहे. पक्षाची ताकद वाढत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत समन्वय झाला तर युती अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे.
- काका कुडाळकर, प्रवक्ते, भाजप.

राणेंना प्रश्‍न सोडवावेत असे वाटले नाही
केंद्र व राज्य शासन महिलांसाठी विविध योजना राबवित आहे. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत महिला चूल सोडून गॅसकडे वळल्या. हा प्रश्‍न नारायण राणे, सोनिया गांधी आणि मित्रपक्षांना कधी सोडवावा, असे वाटले नसल्याचा टोला श्री. चव्हाण यांनी लगावला.

Web Title: percentage politics in zp