बारमाही कोसळणारा धबधबा निधीबाबत कोरडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

सवतकडा-परीटकडा - माय राजापूरचा पावणेसहा कोटींचा आराखडा

राजापूर - सुमारे दीडशे फूट उंचावरून बारमाही कोसळणारा चुनाकोळवण येथील सवतकडा आणि परीटकडा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. येथे विकास झाल्यास हा परिसर पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनू शकेल. तालुक्‍यातील उन्हाळे येथील गंगातीर्थाला पर्यटन विकासमधून निधी उपलब्ध झाला तसाच या परिसरासाठीही निधी मिळावा अशी मागणी होत असून, या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी माय राजापूर संस्थेचे जगदीश पवार यांनी सुमारे पावणेसहा कोटींचा आराखडा बनवला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्‍यातील ओणीपासून सुमारे बारा कि.मी. अंतरावर असलेल्या चुनाकोळवण येथे सवतकडा आणि परीटकडा धबधबा आहे. या धबधब्याला नैसर्गिक सौंदर्याचे कोंदण लाभले आहे; मात्र या परिसरात काहीही विकास झालेला नाही. त्यासाठी विविध स्तरांवर हालचाली सुरू आहेत; मात्र अद्यापही मूर्त रूप मिळालेले नाही. चुनाकोळवण धबधब्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टीने पवार बंधूंनी विकास आराखडा तयार केला. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. पवार यांनी बनवलेला विकास आराखडा नुकताच चुनाकोळवणच्या सरपंच रोहिता गुरव यांच्यासह अन्य ग्रामस्थांकडे सुपूर्द करण्यात आला.

तालुक्‍यातील उन्हाळे येथील गंगातीर्थक्षेत्राला पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने शासनाच्या पर्यटन विभागाकडून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. अशाप्रकारे चुनाकोळवण धबधब्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाल्यास या धबधब्याचाही विकास होईल. त्यादृष्टीने याकडे शासनाने लक्ष देऊन विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पर्यटकांसह निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.

काय आहे या आराखड्यात...
आराखड्यामध्ये पर्यटकांना सोयीसुविधा, धबधब्याचे सौंदर्य जवळून आणि दूरवर जातानाही अनुभवण्याची संधी, धबधब्यानजीक गॅलरी, कमानी पूल यांचा समावेश आहे; मात्र तेथील निसर्गसौंदर्याला कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.

चुनाकोळवणच्या धबधब्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास त्या परिसरातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या धबधब्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून लवकरच पालकमंत्र्यांची भेट घेणार आहोत.
- जगदीश पवार, प्रगत आणि माय राजापूर

Web Title: Perennial waterfall fund dry befall