सोनवडे - घोटगे घाटमार्गाच्‍या कामाला परवानगी

सोनवडे - घोटगे घाटमार्गाच्‍या कामाला परवानगी

कणकवली - गेली ४० वर्षे रखडलेला सोनवडे-घोटगे घाटमार्गाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. घाटमार्गाच्या आवश्‍यक त्या सर्व परवानग्या मिळविल्यानंतर वनखात्याने प्रस्तावित घाटमार्गातील झाडांची तोड आणि वनक्षेत्रात रस्ता तयार करण्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. नोव्हेंबरपासून काम 
सुरू होणार आहे. 

दरम्यान, घाटमार्गात टोलनाका प्रस्तावित आहे.टोलनाक्‍यावरून वनविभागाच्या वाहनांना कोणताही टोल लावला जाऊ नये, असेही निर्देश मुख्य वनसंरक्षक विभागाने बांधकाम विभागाला दिले आहेत. सोनवडे-घोटगे घाटमार्गामध्ये वनविभागाच्या २५.७६ हेक्‍टर क्षेत्रामध्ये ११ हजार १९२ झाडे तोडली जाणार आहेत. केंद्राचा वन्यजीव विभाग, पर्यावरण दाखले, पर्यायी जमीन आदी कारणांमुळे सोनवडे- घोटगे घाटमार्ग गेली ४० वर्षे रखडला होता. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी गेली तीन वर्षे या घाटमार्गाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.

त्यानंतर आता घाटमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला वनविभागाने मंजूरी दिली आहे. त्याबाबतचे पत्र मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर या विभागाने संबंधित विभागांना काल (ता.२८) पाठविले आहे.

मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या आदेशामध्ये कोल्हापूर व सावंतवाडी वन विभागातील २५.७६ हे. आर मधील मठ, कुडाळ, पणदूर, घोटगे, सोनवडे, नाईकवाडी, शिवडाव, गारगोटी, घाटरस्ता राज्य महामार्ग क्र. १२० ते १२१ च्या रस्त्याच्या कामालाही परवानगी देण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच जेवढी वृक्षतोड होणार आहे. त्याच्या पर्यायी वनीकरणासाठी जादा रक्‍कमेचे हमीपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.

तोडण्यात येणारी झाडे
सिंधुदुर्ग - ५१२४
कोल्हापूर - ६०६८
एकूण - १११९२

सोनवडे घाटमार्गासाठी आम्ही ४० वर्षे लढा सुरू ठेवला होता. त्याला आता यश आले आहे. घाटमार्गाच्या निविदाही निघाल्याने आता काम वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
- महेंद्र नाटेकर,
अध्यक्ष सोनवडे-घोटगे घाटमार्ग संघर्ष समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com