समुद्रात बांगड्याचे थवे पाहून पर्ससीन ट्रॉलर्सधारकांची घुसखोरी

प्रशांत हिंदळेकर
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

मालवण - येथील समुद्रात गेले काही दिवस परराज्यातील पर्ससीन ट्रॉलर्सची घुसखोरी सुरूच असून आजही सात ते आठ वाव समुद्रात बांगड्याचे थवे पाहून पर्ससीन ट्रॉलर्सधारकांनी ही मासळी लुटण्यासाठी घुसखोरी केल्याचे दिसून आले.

मालवण - येथील समुद्रात गेले काही दिवस परराज्यातील पर्ससीन ट्रॉलर्सची घुसखोरी सुरूच असून आजही सात ते आठ वाव समुद्रात बांगड्याचे थवे पाहून पर्ससीन ट्रॉलर्सधारकांनी ही मासळी लुटण्यासाठी घुसखोरी केल्याचे दिसून आले.

हक्काची मासळी पर्ससीनधारकांकडून ओरबाडून नेली जात असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या उदासीन धोरणामुळे पारंपरिक मच्छीमार संतप्त बनले असून केव्हाही उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पर्ससीन नेटच्या अधिकृत मासेमारीस गेल्या महिन्यापासून सुरवात झाली आहे. त्यामुळे परराज्यातील, परजिल्ह्यातील अधिकृत तसेच अनधिकृत पर्ससीनधारक येथील समुद्रात मोठ्या संख्येने घुसखोरी करत मासळीची लूट करत आहेत. गेल्या महिन्यात पारंपरिक मच्छीमारांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर देवगड येथील मत्स्य परवाना अधिकार्‍याला घेऊन समुद्रात धडक कारवाईची मोहिम राबविण्यात आली. यात पहिलीच पकडलेली रत्नागिरीतील अनधिकृत पर्ससीनची नौका काळोखाचा फायदा उठवीत पळून गेली. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. त्यानंतर रत्नागिरीतीलच तीन अनधिकृत पर्ससीनचे ट्रॉलर्स किल्ल्यानजीकच्या समुद्रात मासेमारी करताना पकडण्यात आले. या तिन्ही ट्रॉलर्सवरील मासळीची लिलाव करून दंडात्मक कारवाईही झाली. मात्र त्यानंतरही परराज्यातील, परजिल्ह्यातील पर्ससीनची घुसखोरी थांबलेली नाही. 

गेल्या महिन्यात तसेच या महिन्यातील परिस्थिती पाहता शासकीय कार्यालयाच्या सुटीच्या काळातच पर्ससीन ट्रॉलर्स घुसखोरी करत असल्याचे दिसून आले आहे. यात मत्स्य व्यवसाय अधिकार्‍यांचे मोबाईल नॉट रिचेबल असल्याने हे ट्रॉलर्स पकडायची कार्यवाही करायची कोणी? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सध्या समुद्रात बांगडा, सुरमई, पापलेट, म्हाकूल यासारखी किमती मासळीची मोठी कॅच मिळत आहे. त्यामुळेच परराज्यातील पर्ससीनधारक बारा वावाच्या आत घुसखोरी करून या मासळीची लूट करत आहेत. मत्स्य व्यवसायची गस्तीनौका नसल्याने पारंपरिक मच्छीमारांना ही लूट होताना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. 

आज सात ते आठ वाव समुद्रात बांगडा मासळीचे थवे मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. काही पारंपरिक मच्छीमार मासेमारीसाठी गेले असता त्यांना पर्ससीन धारकांनी तीन ते चार वावाच्या आत घुसखोरी करत बांगडा मासळी लुटण्यासाठी जाळ्या टाकल्याचे दिसून आले. पर्ससीनची घुसखोरी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून केवळ दिखाऊच कारवाई केली जात असल्याने मच्छीमार संतप्त बनले असून याचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Web Title: Persecin trail holders infiltration in Malvan