पालीत पेट्रोकेमिकल कंपनीच्या डांबर प्लांटला भीषण आग

अमित गवळे
मंगळवार, 18 जून 2019

  • पालीत स्फोटांनी परिसर हादरला, नागरिकांमध्ये घबराट
  • ट्रकनेही घेतला पेट
  • तब्बल दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण

पाली (जि. रायगड) : सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील हेदवली गावाजवळील अष्टविनायक पेट्रोकेमिकल कंपनीच्या डांबर प्लांटला सोमवारी  (ता. 17) रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कशाने लागली याबाबतचे कारण कळलेले नाही. कंपनीतील डांबराच्या डब्यांच्या होणार्‍या स्फोटांनी संपुर्ण परिसर हादरुन गेला होता. तर यावेळी येथील एका ट्रकनेही पेट घेतला. कंपनीतील कामगार व स्थानिकांत स्फोटाच्या भितीने प्रचंड घबराट पसरली होती. 

अष्टविनायक पेट्रोकेमिकल कंपनी ही डांबर कंपनी असून डांबर प्लांटला आग लागल्याची माहिती मिळताच पाली व जांभुळपाडा दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. तसेच तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्त यांनी देखील तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरु केले. आगीचे स्वरुप इतके भीषण होते की आगीचे लोट व ज्वाळा तासनतास भडकत होत्या. ज्वाळा लांबून आसमंतात दिसत होत्या. खोपोली नगरपरिषद येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या तब्बल दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

pali

सर्वत्र डांबर सांडल्याने मदतकार्यास अडथळा येत होता. पेट्रोकेमिकल व डांबर प्लांट असल्याने स्फोट वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे स्फोटाच्या भितीने कंपनीतील आग आटोक्यात येईपर्यंत सारेंच भयभीत झाले होते. संभाव्य धोका लक्षात घेत कंपनीतील कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढून परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. तसेच परिसरातील वीज पुरवठा ही खंडित केला होता.

या आगीत लाखोच्या मालमत्तेची वित्तहाणी झाली असली तरी सुदैवाने कोणतीही जिवीतहाणी झाली नाही. रायगड जिल्ह्यातील अनेक कंपन्यां या अग्नीमुखातआगीच्या तोंडावर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज प्रा.लि. रसायनी पाताळगंगा कंपनीतील अग्नीतांडवानंतर हेदवली पेट्रोकेमिकल्स डांबर प्लांटला लागलेल्या आगीच्या घटनेने कामगार व स्थानिक जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

आगीचे वृत्त कळताच पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. एस. एस. खेडेकर. पो. ह. जी. पी म्हात्रे, पो. कॉ. आर. डी. कांदे, पो. कॉ. के. एन. भोईर, स. फौ एच. डी. पाटील, आदिंसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचून अग्नीशमन दलाला पाचारण केले. हेदवली डांबर प्लांटमधील स्फोट व भीषण आगीच्या घटनेनंतर नागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने पाली सुधागड तहसिलदार दिलीप रायन्नावार यांनी तालुक्यातील कंपनीव्यवस्थापकांची शुक्रवारी (ता. 21) बैठक बोलावली आहे.

pali

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A petrochemical companys tar plant was set on fire at pali raigad