esakal | Sindhudurga : रस्त्यावरील खड्डे निधीच्या प्रतीक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

Sindhudurga : रस्त्यांवरील खड्डे निधीच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था फारच बिकट आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांना डिवचण्यासाठी रस्त्यावरील खड्डेच विरोधकांचे हत्यार बनले आहे. सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या एकूण ५५ रस्त्यांच्या १०४५ किलोमीटर इतक्या एकूण लांबीपैकी ५०६ किलोमीटरच्या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. हे सगळे रस्ते आजही शासन निधीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यामध्ये सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गेली काही वर्षे या रस्त्याकडे बांधकाम विभागाकडून केलेले दुर्लक्ष आणि कोरोना काळात अडकलेला शासन निधी यामुळे रस्त्यांची अवस्था फारच चिंताजनक बनली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांची परिस्थिती हीच आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही जायचं झाल्यास समोर रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न प्रामुख्याने उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यातील राजकारण रस्त्यावरील खड्ड्यांवरूनच बहुतेक वेळा पाहायला मिळत आहे.

विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना डिवचण्यासाठी एक प्रकारे हाच मुद्दा पुढे करत आहेत. यामध्ये खड्ड्यात वृक्षारोपण, रास्ता रोको आदींसारखे प्रकारही विरोधकांकडून केले जात आहेत; मात्र रस्त्यावरील खड्डे काही बुजताना दिसत नाहीत. याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला, वाहनचालकांना विविध मार्गाने सोसावा लागत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र शासनाकडे बोट दाखवत आहेत. वेळोवेळी निधीसाठी पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध होत नसल्याने आमचे हात बांधले गेले आहेत, असे सांगत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्यस्थिती पाहता सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणाऱ्या कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग या पाच तालुक्यांतील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व प्रमुख राज्यमार्ग या तिन्ही प्रकारातील एकूण ५५ रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. या तिन्ही प्रकारातील रस्त्यांची एकूण लांबी ही १०४५ किलोमिटर एवढी आहे. पैकी ५०६ किलोमीटरचे रस्ते खड्डेमय तसेच विविध कारणाने खराब झाले आहेत. या रस्त्यामध्ये झाराप-आकेरी-सावंतवाडी-बांदा-दोडामार्ग-माटणे-आयी हा ५९ किलोमीटरचा रस्ता पूर्णतः खड्डेमय बनला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्यस्थिती पाहता सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणाऱ्या कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग या पाच तालुक्यांतील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व प्रमुख राज्यमार्ग या तिन्ही प्रकारातील एकूण ५५ रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. या तिन्ही प्रकारातील रस्त्यांची एकूण लांबी ही १०४५ किलोमिटर एवढी आहे. पैकी ५०६ किलोमीटरचे रस्ते खड्डेमय तसेच विविध कारणाने खराब झाले आहेत. या रस्त्यामध्ये झाराप-आकेरी-सावंतवाडी-बांदा-दोडामार्ग-माटणे-आयी हा ५९ किलोमीटरचा रस्ता पूर्णतः खड्डेमय बनला आहे.

रस्त्यांत खड्डा की, खड्ड्यात रस्ता? असा प्रश्न त्याठिकाणी वाहनचालकांना पडत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या लक्षात घेता वाहन चालक आता पर्यायी रस्त्याचा वापर करताना दिसत आहेत. एकूणच या रस्त्यावरून अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील असलेल्या या रस्त्यावरून केसरकर यांनाही बऱ्याचदा विरोधकांनी टार्गेट केले आहे. पालकमंत्री, खासदार यांनाही लक्ष करून विरोधकांनी भीक मागो सारखे आंदोलनही छेडले आहे. बांधकामचे अधिकारीही या सगळ्याच्या रोषातून सुटले नाहीत; मात्र अद्यापपर्यंत या रस्त्याच्या डागडुजीसाठी काहीच प्रयत्न होताना दिसून येत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

हेही वाचा: 'मुख्यमंत्र्यांच्या अहंकारामुळे रिफायनरीला ग्रहण'

कारिवडे-सावंतवाडी-आरोंदा-रेडी-किरणपाणी या रस्त्याची परिस्थिती ही काही वेगळी नाही.वेंगुर्ले-तुळस-सावंतवाडी, कुडाळ-म्हापण-कोचरे या राज्यमार्गासह कनेडी-कुपवडे-कडावल- नारुर-वाडोस-शिवापूर, शिरशिंगे-कलंबिस्त-वेर्ले-सांगेली-धवडकी-ओटवणे या सह्याद्री राज्यमार्गाचीही परिस्थिती वाईटच आहे. कित्येक वर्ष या रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी होत असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकातून नाराजी आहे.

प्रमुख राज्य मार्गाचा विचार करता मालवण-वायरी-तारकर्ली-देवबाग, चौके-धामापूर-कुडाळ, कुडाळ रेल्वेस्टेशन मार्ग, आकेरी-आंबेरी-वाडोस, आडेली-वजराट-तळवडे-मातोंड-आजगाव, सावंतवाडी-ओटवणे-भालावल-असनिये-झोळंबे आदी प्रमुख राज्यमार्गही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

‘सावंतवाडी बांधकाम’ अंतर्गची स्थिती

  1. कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्गची स्थिती बिकट

  2. पाच तालुक्यांतील एकूण ५५ रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

  3. राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व प्रमुख राज्यमार्गांची लांबी १०४५ कि.मी.

  4. ५०६ किलोमीटर पर्यंत रस्त्यांत खड्डा की, खड्ड्यात रस्ता? असा प्रश्न

  5. -झाराप-आकेरी-सावंतवाडी-बांदा-दोडामार्ग-माटणे-आयी हा ५९ कि.मी.चा रस्ता खराब

''जिल्ह्यातील तिन्ही प्रकारच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार शासनस्तरावर निधीची मागणी केली जात आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. रस्त्यांच्या केवळ डागडुजीसाठी १२.३६ कोटींची गरज आहे. नूतनीकरणासाठी ५७ कोटी गरजेचे आहेत. त्याबाबतचा सर्व्हेही केला असून निधी प्राप्त होताच कामे हाती घेण्यात येतील.''

- श्रीकांत माने, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी

loading image
go to top