सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांना प्लास्टिकचा विळखा

दोडामार्ग - येथील नद्यांना पडलेला प्लास्टिकचा विळखा.
दोडामार्ग - येथील नद्यांना पडलेला प्लास्टिकचा विळखा.

दोडामार्ग - जिल्हाभरातील नदी नाल्यांना प्लास्टिक प्रदूषणाचा विळखा पडला आहे. प्रदूषण टाळायचे असेल आणि पर्यावरण वाचवायचे असेल तर प्लास्टिकचा वापर कमीत कमी करण्याबरोबरच जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. स्वच्छ भारत अथवा स्वच्छ महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या उपक्रमात प्रत्येकाने सहभागी होण्याची गरज आहे.

प्रत्येक घरात वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक वापरले जाते. जगात प्रत्येक व्यक्ती पंधरा किलो तर भारतात प्रत्येक व्यक्ती एक किलो प्लास्टिक दरवर्षी वापरते. छोट्या-छोट्या कारणासाठी प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. वापरायला सहज सोप्या, वजनाला हलक्‍या असल्याने प्रत्येकजण त्याचा वापर सर्रास करतो. स्वस्त मिळत असल्याने व ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्या ग्राहकांना उपलब्ध करून देतो, पण त्या घरी आणल्यावर ग्राहक काय करतो, तर त्या घराबाहेरच्या मोकळ्या जागेत नाहीतर पाण्यात फेकतो. शिवाय त्यातून टाकाऊ पदार्थही टाकतो. 

साहजीकच पिशव्यातील खाद्यपदार्थ अथवा अन्य वस्तूंमुळे जनावरे त्या पिशव्या खातात आणि कालांतराने मरतात किंवा पाण्यातील पिशव्यामुळे पाणी प्रदूषित होते.

ज्यामुळे प्रदूषण होते आणि मानवजातीचे जीवन धोक्‍यात येते. जिल्हाभरातील नदी, ओहोळात आपण नजर टाकली तर प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या यांचा खच पडलेला दिसतो. त्याचा दुष्परिणाम माणसाबरोबरच, जलचर, प्राणीमात्र आणि वनस्पतींवरही होतो. प्लास्टिक वापरावर स्वतःहून निर्बंध घातले नाही अथवा प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी स्वतःहून पावले उचलली नाहीत तर नदीनाल्यांना पडलेला प्रदूषणाचा विळखा आपल्या गळ्याभोवती पडायला वेळ लागणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेसाठी आणि कचरा व्यवस्थापनासाठी स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा. ती काळाचीच गरज आहे.

प्रजाती धोक्‍यात
प्लास्टिकमुळे जगभरात दररोज चौदा हजार व्यक्ती मृत्यू पावतात. भारतात ते प्रमाण दरदिवशी ५८० इतके आहे. प्लास्टिकमुळे केवळ माणसेच नव्हे तर पाळीव जनावरे, जलचर प्राणीही मृत्यू पावतात. आपल्याकडे नदीनाल्यात टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे विविध मत्स्य प्रजातीही धोक्‍यात आल्या आहे. प्लास्टिकचे विघटन सुमारे एक हजार वर्षापर्यंत होत नाही. शिवाय प्लास्टिकमुळे वेगवेगळे विषारी गॅस, घटक जमीन व पाण्यात मिसळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com