साखरपात नऊ जणांना झाली विषबाधा ; सात जणांवर उपचार सुरू , तर दोघांना रत्नागिरीत हलविले ; कारण सविस्तर वाचा......

नागेश पाटील | Tuesday, 28 July 2020

मुर्शी येथील घटना; दोघांना रत्नागिरीत हलविले, प्रकृती स्थिर

साखरपा (रत्नागिरी) : मुर्शी येथील नऊ जणांना रानातील मशरूम खाऊन विषबाधा झाली. त्यातील सात जणांवर साखरपा येथे उपचार सुरू असून, दोघांना रत्नागिरी येथे  हलविले आहे. 

याबाबत साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मुर्शी येथील काही तरुण रविवारी सायंकाळी रानातील मशरूम आणण्यासाठी गेले होते. त्यांनी आणलेल्या मशरूमची घरी भाजी करण्यात आली. ती खाऊन सगळ्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यातच उलट्या आणि जुलाबही होऊ लागल्याने सगळ्यांना साखरपा येथील डॉक्‍टर विद्याधर केतकर यांच्याकडे नेण्यात आले. त्यांच्याच सल्ल्याने सगळ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. 

हेही वाचा- ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, कुठल्या जिल्ह्यातील ही स्थिती? -

शरद भिंगार्डे (वय ६५), चिन्मय भिंगार्डे (१९), रत्नकांत भिंगार्डे (६०), सुधाकर भिंगार्डे (५५), अरविंद भिंगार्डे (७१), अंजना भिंगार्डे (५४), आशिष भिंगार्डे (२१), सुमती भिंगार्डे (९०), शिल्पा भिंगार्डे (४०) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. सुमती भिंगार्डे आणि शिल्पा भिंगार्डे यांना रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. बाकीच्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्‍टरांनी या सर्वांना तपासले असता मशरूममुळे ही विषबाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले. मशरूम नीट साफ न केल्याने ही विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

संपादन - अर्चना बनगे