`सकाळ`च्या वृत्ताची दखल, पोलिस अधीक्षकच पोचले बांद्यात

निलेश मोरजकर
मंगळवार, 7 एप्रिल 2020

दोडामार्ग व बांदा येथे दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आल्याने बेकायदा दारू वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले होते. 

बांदा (सिंधुदुर्ग) -  जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बेकायदा दारू वाहतुकीवर 3 कारवाया करण्यात आल्या आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा भासत असताना गोवा बनावटीची दारू सर्रासपणे मिळत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. ही दारू वाहतुक थेट तेरेखोल नदीपात्रातून सीमा पार होत असल्याचे वृत्त सकाळने दिले होते. या पार्श्‍वभूमिवर जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी आज सकाळीच सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील सीमा तपासणी नाक्‍याला "सरप्राईज' भेट देत तपासणीचा आढावा घेतला. 

यावेळी नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांना गोव्यातून अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. "सकाळ'ने शनिवारच्या अंकात (ता.4) गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर दोडामार्ग व बांदा येथे दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आल्याने बेकायदा दारू वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले होते. 

गोव्यातून अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या वाहनांमधून दारूची वाहतूक करण्यात येते. कणकवली येथे झालेल्या कारवाईत हे उघड झाले. कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. प्रत्येक राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. पत्रादेवी येथे सिंधुदुर्ग व गोवा पोलिसांनी सीमा बंद केल्या आहेत. केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. 

बेकायदा दारू वाहतुकीसाठी व्यावसायिक जिल्ह्यात येण्यासाठी आडमार्गाचा वापर करतात. तसेच तेरेखोल नदीतील जलमार्गाचा वापर करत बेकायदा दारू चोरट्या पद्धतीन जिल्ह्यात आणली जाते. "सकाळ'ने "तळीरामांना आधार तेरेखोलचा' अशा मथळ्याखाली बेकायदा दारू वाहतुकीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. यामुळे खडबडून जाग्या झालेल्या पोलीस प्रशासनाने नदीकिनारी गस्त सुरू केली. दोन दिवसांपूर्वी सीमेवर सटमटवाडी येथे अल्टो मोटारीतून नेण्यात येणाऱ्या दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली होती. या कारवाई बाबत स्थानिक पोलीस अनभिज्ञ असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

स्वतः पोलिस अधीक्षक गेडाम आज बांद्यात आल्याने शहरातील पोलिस यंत्रणा अलर्ट झाली. शहरात येणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना प्रवेश बंदी करत शहराबाहेर थांबविण्यात आले होते. पोलीस अधीक्षक गेडाम यांनी सकाळीच येथील तपासणी नाक्‍याला भेट दिली. यावेळी कर्मचाऱ्यांकडून तपासणीचा आढावा घेतला. जिल्ह्यात अत्यावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police action banda sindhudurg