कलमठला आले पोलिस छावणीचे रूप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

कणकवली - विरोधकांच्या हातात राडा संस्कृतीचे आयते कोलीत मिळू नये याचा कटाक्षाने प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना कलमठमधील मारहाणीची घटना थोपवता आली नाही आणि यातून अखेर वाद पेटला. 

याचे राजकीय भांडवल करून विरोधकांनी रान उठविल्यानंतर काँग्रेसमध्ये मात्र कमालीची शांतता होती. कलमठच्या संपूर्ण गटाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. शेवटच्या टप्प्यात प्रचाराला लागलेल्या गालबोटाचे परिणाम कोणाला भोगावे लागतात हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 

जिल्ह्यातील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्राची यादी या वेळी प्रशासनाकडे नव्हती. जिल्ह्यातील ५० गटांत आणि १०० गणांतील ८३८ मतदान केंद्रांत शांततेत प्रचार सुरू होता. रविवारी (ता. १९) रात्री काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवार प्रज्ञा ढवण यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. हा प्रकार काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या गावातच झाला. छुप्या प्रचाराची सांगता होऊन अवघा तास उलटला आणि हा वाद झाला होता. त्यामुळे सोमवारी काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू राहिले होते. या घटनेनंतर पोलिस यंत्रणाही जागृत झाली होती. साहजिकच यंत्रणेने कलमठ गटाकडे सुरक्षिततेची कुमक वाढविली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच कलमठ, वरवडे, आशिये, पिसेकामते या भागात तणाव होता. नागरिक मात्र मतदानासाठी बाहेर पडत होते. भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी या घटनेनंतर काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आता याचे फायदे-तोटे कोणत्या उमेदवाराला मिळणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 

जिल्ह्यातील ५० गटांत सकाळपासून शांततेत मतदान सुरू झाले. संवेदनशील भाग म्हणून या खेपेस आंब्रड (ता. कुडाळ) गटात राज्य राखीव दलाचे दोन प्लाटून तैनात करण्यात आले होते; परंतु आज सायंकाळी उशिरापर्यंत सर्वत्र शांततेत मतदान सुरू होते. यंदा फार मोठ्या जाहीर सभा घेण्याची संधी पक्षाच्या नेत्यांना मिळाली नाही. 

जिल्ह्याबाहेरील कार्यकर्त्यांची वर्दळ कमी 
राज्यभरात एकाच वेळी मतदान झाल्याने आणि दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्गाबरोबर मुंबई आणि जवळपासच्या जिल्ह्यांत मतदान एकाच वेळी असल्याने जिल्ह्याबाहेरील कार्यकर्ते येथे दाखल होऊ शकले नाहीत. त्यामुळे वादावादीचे प्रसंग टळले गेले, असे उमेदवार आणि कार्यकर्ते सांगत होते. या खेपेस कोणताही वाद होऊ नये म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले; परंतु अखेरच्या टप्प्यात ओढवलेले संकट हे विरोधकांच्या हातातील आयते कोलीत ठरले आहे. त्यामुळे आता कलमठ वरवडेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: police force