राजकीय भूकंपाच्या हालचाली गतिमान 

sawantwadi
sawantwadi

सावंतवाडी - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. काही बडे नेते पर्यायाच्या शोधात आहेत. गेली काही वर्षे राजकीय इनकमिंगसाठी सर्वाधिक पसंती असलेल्या कॉंग्रेसमध्ये या वेळी आऊटगोईंग जास्त होण्याची चिन्हे असून, या आधी राजकीय खिजगणतीत नसलेल्या भाजपमध्ये सर्वाधिक इनकमिंग होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या वेळी मतदारसंघाच्या रचनेत बदल झाले आहेत. शिवाय आरक्षणामुळेही अनेक इच्छुकांना आपले हक्काचे मतदारसंघ सोडावे लागणार आहेत. त्यामुळे खुल्या असलेल्या मतदारसंघात स्पर्धा तीव्र आहे. यातच निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हेवेदावेही उघड झाले आहेत. 

कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या नेटवर्कमध्ये सर्वात प्रभावी असलेला पक्ष मानला जातो. साहजिकच त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. अलीकडच्या काळात अंतर्गत गट-तटही सक्रिय झाल्याचे चित्र आहे. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर एका नेत्याचे व्हाईस रेकॉर्ड प्रकरण पुढे आले आहे. काही ठिकाणी तिकीटासाठीची चढाओढ वैयक्तिक पातळीवर दिसत आहे. या सगळ्यातून कॉंग्रेसचे काही नेते शिवसेना-भाजपच्या संपर्कात असल्याचे चित्र आहे. कुडाळ तालुक्‍यात सर्वाधिक अस्वस्थता आहे. मालवणमधील काही बडे नेते पक्षांतराच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर या उलथापालथी अधिक उघड होण्याची चिन्हे आहेत. 

पक्षांतरासाठी शिवसेना हा काहींसाठी पर्याय ठरत आहे, मात्र पालिका निवडणुकांमध्ये या पक्षाला पाहिजे तितकी प्रभावी मते न मिळाल्याने इच्छुक त्यांच्याकडे जाण्याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. त्यातच शिवसेनेतील गटबाजीही नाराजांना आपल्याकडे खेचण्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे. शिवाय सेनेत इच्छुकांची संख्या जास्त आहे. 

या आधी कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या भाजपमध्ये सर्वाधिक इनकमिंग होण्याची शक्‍यता आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने मिळालेला गॉडफादर आणि केंद्र आणि राज्यात असलेली सत्ता ही या मागची कारणे आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा होईल, अशी धारणाही काहींमध्ये आहे. काही बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. 

एकूणच जिल्ह्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे, मात्र त्या उघडपणे जाहीर होत नसल्यातरी छुप्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू आहे. तिकीट वाटपाच्या काळात बंडखोरीबरोबरच पक्षांतर नाट्य रंगण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com