खेडमधील आघाडी म्हणजे आमदार कदमांची मनमानी - निसार खतीब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

खेड - राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी मनसेसोबत आघाडी करताना मनमानी निर्णय घेतले. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनासुद्धा विश्‍वासात घेतले नाही. आघाडीचे निर्णय आणि उमेदवार निश्‍चिती झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगण्यात आले, असे आरोप निसार खतीब यांनी केले आहेत. आमदारांच्या एकाधिकारशाहीच्या कारभाराला कंटाळून पक्ष आणि शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे खतीब यांनी सांगितले. त्यांच्या या पवित्र्याने येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस ढवळून निघाली आहे.

श्री. खतीब यांनी शहराध्यक्षपदासह पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव व जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांना पाठविले आहे. श्री. खतीब राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचे (1999) सदस्य होते. ते, 2006 ते 2016 अशी सलग दहा वर्षे खेड शहराध्यक्षपदी कार्यरत होते. शहरात पक्षाची स्थिती बिकट असताना त्यांनी राष्ट्रवादीची ताकद वाढविली. त्यांनी राजीनामा राष्ट्रवादीच्या अपयशाबद्दल न देता आमदारांविरोधात दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राजीनाम्याविषयी खतीब यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले की, पालिका निवडणुकीच्या आधी आमदार संजय कदम यांनी पुढाकार घेऊन शहर विकास आघाडी तयार केली. त्यावेळी शहरातील कोणत्याही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्याला विश्‍वासात घेतले गेले नाही. यामुळे येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आधी खेड तालुका राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत.

खतीब म्हणाले, 'आमदार संजय कदम यांनी शहर विकास आघाडीचा निर्णय घेताना कोणालाही विचारले नाही. आघाडी केल्यानंतर आम्हाला निर्णय सांगितला. आमदारांनी असे निर्णय प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांवर लादणे योग्य नव्हे. राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता विधानसभेच्या निवडणुकीत संजय कदम यांच्या पाठीशी होता, म्हणूनच ते निवडून आले, हे त्यांनी लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. पालिका निवडणुकीत सर्व उमेदवार निश्‍चित केले व मग आम्हाला सांगितले. मी दोन उमेदवार दिले, ते निवडूनदेखील आले; परंतु या निवडणुकीत पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. माझा कार्यकर्ता कसा आहे, हे मी शहराचा दहा वर्षे अध्यक्ष असल्यामुळे मला माहीत आहे.''

अपयशाची जबाबदारी नको म्हणूनच...
दहा वर्षे शहराध्यक्षपद सांभाळल्यानंतर राष्ट्रवादीच्या पराभवाला कारणीभूत असल्याच्या भावनेतून नैतिक भूमिकेतून खतीब यांनी राजीनामा द्यायला हवा होता; परंतु त्याऐवजी अपयशानंतर सारे खापर आमदारांवर फोडून त्यांनी पक्षत्यागही केला. या बाबत आमदार समर्थकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

Web Title: politics in khed