रत्नागिरी भाजपत शह-काटशहाचे राजकारण 

रत्नागिरी भाजपत शह-काटशहाचे राजकारण 

रत्नागिरी - केंद्रात आणि राज्यातील सत्तेचा आधार घेत स्थानिक पातळीवर भाजपमध्ये पक्षांतर्गत शह-काटशहाच्या राजकारणाला वेग आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रभारीपदाची जबाबदारी प्रसाद लाड यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर बाळ माने विरोधकांनी उचल खाल्ली. त्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. चिपळूण, राजापुरातील उमेदवारीवरून ठिणगी पडण्याची शक्‍यता आहे. 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यामुळे उमेदवारी वाटपासह पक्षांतर्गत वजन वाढविण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये चुरस सुरू आहे. प्रत्येक जण गॉडफादरचा आधार घेऊन विरोधकांवर मात करण्याचा आटापिटा करीत आहे. 

असा बसवला जम 

जिल्ह्यात बाळ माने, डॉ. विनय नातू यांनी स्वतःचे मतदारसंघात शाबूत ठेवताना भाजपचा झेंडा ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते; मात्र केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यानंतर तालुकास्तरावर नवीन नेतृत्व तयार झाले. अन्य पक्षातून आलेल्यांनीही आपले प्रस्थ निर्माण केले आहे. बाळ मानेंकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आल्यानंतर देवरूखसह चिपळूण नगराध्यक्षपदी भाजपला यश मिळाले. त्यामुळे मानेंची पक्षातील पत वाढली. लांजा नगरपंचायतीत त्यांनी जम बसविला होता. या घडामोडीतही माने विरोधकांनी जिल्हाध्यक्ष बदलासाठी जोरदार प्रयत्न केले होते. राजापूर नगराध्यक्ष निवडीत अपयश आल्यानंतर मानेंच्या बदलासाठी जोर आला. पण सक्षम उमेदवाराअभावी मानेंना मुदतवाढ मिळाली. 

खलबते रंगू लागली 
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या प्रसाद लाड यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाली. पाठोपाठ रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारीपदही दिले. लाड महत्त्वांकांक्षी असल्याने त्यांनी अल्पावधीत वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत माने विरोधकांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. लाड यांनाही ते अभिप्रेत असून ते मानेंकडून होणाऱ्या चुकीवर बोट ठेवण्याची संधी सोडत नाहीत. चिपळूण मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे बाळ मानेंनी पत्रकारांपुढे जाहीर केल्यानंतर माने विरोधकांमध्ये खलबते रंगू लागली आहेत. तोच आधार घेऊन मानेंचे वक्‍तव्य प्रसाद लाड यांनी खोडून काढत उमेदवार जाहीर करण्याचे अधिकार त्यांना नाहीत, हे जाहीर केले. निवडणुकीच्या तोंडावर जाहीर भाष्य करण्यापेक्षा लाड यांना हा विषय पक्षांतर्गत चर्चेतून सोडविता आला असता; परंतु मिळेल ती संधी न सोडण्याचा लाड यांचा पवित्रा मानेविरोधकांच्या निश्‍चितच पथ्थ्यावर पडणारा आहे. या घडामोडींमुळे पक्षांतर्गत गटा-तटाचे राजकारण ऐरणीवर येत असल्यामुळे पक्षश्रेष्ठी यामध्ये कोणता पवित्रा घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मानेंविरोधात व्यूहरचना 

जिल्हाध्यक्षपदावर विराजमान झाल्यावर मानेंनी चिपळुणात मिळालेले यश साजरे करताना वाढदिवसाचा धमाका उडवून दिला. भाजपच्या आजवरच्या संस्कृतीला साजेसे हे नाही, अशी प्रतिक्रिया पक्षातील अनेकांनी व्यक्‍त केली होती. या रंगीबेरंगी कार्यक्रमापासून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना एवढेच नव्हे तर माजी जिल्हाध्यक्षांना बाजूला ठेवले गेले होते. माने विरोधकांच्या मनात हा सल होताच. जिल्ह्यात बंदरमंत्री रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड असे नेते उभे करण्यात आले. पक्षातील पदे आणि प्रवक्‍ता निवडताना मानेंच्या पसंतीला प्राधान्य देण्याऐवजी दीपक पटवर्धनांचे नाव पुढे नेण्यात आले. या सर्व कोंडीतून माने मार्ग कसा काढणार, याची प्रतीक्षा अनेकांना आहे. 

रत्नागिरी वगळता चार मतदारसंघातून उमेदवार तयार आहेत. चिपळूणात स्वतः आणि राजापुरात उल्का विश्‍वासराव काम करीत आहोत. दोन्ही मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो. 
- बाळ माने,
जिल्हाध्यक्ष, भाजप 

उमेदवारी जाहीर करण्याचे अधिकार कोणालाही नाहीत. कोअर कमिटीला आहेत. मानेंनी नावे घेतली असतील, तर त्यांच्याकडून त्याबाबत माहिती घेणार. 

- प्रसाद लाड, प्रभारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com