कणकवलीत दिग्गजांचा कस लागणार

कणकवलीत दिग्गजांचा कस लागणार

शिवसेना-भाजपला खाते उघडण्याची प्रतीक्षा : काँग्रेसलाही बालेकिल्ला राखावा लागणार

कणकवली - कणकवली तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यात मुसंडी मारण्यासाठी युती करून निवडणूक लढविण्याबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत झाले आहे. दुसरीकडे काँग्रेसमधील नाराजांनी बंडखोरी करून निवडणूक लढविण्याची तयारी ठेवलीय. त्यामुळे या निवडणुकीत कणकवली तालुक्‍यातील दिग्गज नेतेमंडळींचा कस लागणार आहे.

तालुक्‍यात आठ जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत, तर पंचायत समितीच्या १६ पैकी १५ काँग्रेस आणि १ राष्ट्रवादी असे संख्याबळ आहे. मागील निवडणुकीत शिवसेना-भाजपला कणकवली तालुक्‍यात खाते उघडता आलेले नाही, मात्र यंदाच्या निवडणुकांत कोणत्याही परिस्थितीत निम्म्याहून अधिक जागा घेण्यासाठी शिवसेना-भाजप युतीच्या नेतेमंडळींनी कंबर कसली आहे.

कणकवली तालुक्‍यातील सर्वच मतदारसंघात काँग्रेसचे सतीश सावंत, संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांनी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. याखेरीज सुरेश सावंत, संतोष कानडे, मधुसूदन बांदिवडेकर, रंजन राणे, बबन हळदिवे, रत्नप्रभा वळंजू, संदेश पटेल, तुळशीदास रावराणे, मनोज रावराणे, विभावरी खोत, सुरेश ढवळ आदी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचीही भक्‍कम फळी या मतदारसंघात आहे. त्यामुळे या निवडणुकांत काँग्रेस पुन्हा निर्विवाद वर्चस्व राखणार, अशी राजकीय स्थिती होती; परंतु कणकवलीत मतदारसंघांचे आरक्षण बदलल्याने अनेक इच्छुकांची कोंडी झाली आहे. अनेक दिग्गजांना आपले मतदारसंघ बदलावे लागणार असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. याखेरीज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जवळचा असणारा जुना कार्यकर्ता तर आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणारे नव्या उमेदीचे कार्यकर्तेही यंदाच्या निवडणुकीत हमखास तिकीट मिळणार या शक्‍यतेने प्रचार कामाला लागलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. बंडखोरी झाल्यास काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची ताकद पणाला लागणार आहे.

कणकवली तालुक्‍यात भाजपची पाटी कोरीच राहिली आहे; मात्र राज्यात असलेल्या सत्ताबळाचा वापर करून कणकवली मतदारसंघात भाजपचे कमळ फुलविण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी व्यूहरचना सुरू केली आहे. अलीकडेच संदेश पारकर हेदेखील भाजपमध्ये दाखल झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर काही जागा भाजपकडे येतील, अशीही अपेक्षा भाजप नेत्यांना आहे. पुढील विधानसभा निवडणुका स्वबळावर किंवा युती करून लढवायची झाल्यास कणकवली तालुक्‍यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवावी लागणार आहे. त्यादृष्टीने या निवडणुकीत भाजप नेत्यांना आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे.

सेनेची पाटी कोरीच...
कणकवली तालुक्‍यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचीही पाटी कोरीच राहिली आहे, मात्र मागील काही महिन्यांत शिवसेनेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले आहेत; मात्र काही पदाधिकारी-नेत्यांमधील अंतर्गत गटबाजी कायम आहे. गौरीशंकर खोत, शंकर पार्सेकर आदी पदाधिकारी पक्षप्रवाहापासून अद्यापही बाहेर आहेत; मात्र सध्या इतर पक्षातील मंडळींचा  शिवसेनेकडे ओघ वाढत आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते बाळा भिसे हेदेखील पुढील दोन दिवसांत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. या सर्वांनाच या निवडणुकीत आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com