टेमघर नाला प्रदुषीत, संतप्त जमावाचा रास्ता रोको

सुनील पाटकर
गुरुवार, 7 जून 2018

महाड औद्योगिक क्षेत्रातील टेमघर नाल्यात कारखान्यांचे सांडपाणी मिसळल्याने हा नाला प्रदुषित झाला असुन याकडे एमआयडीसीने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी व संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी टेमघर पूलावर रास्ता रोको केले. अचानक झालेल्या या रास्तारोकोमुळे औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अर्धा तास कोलमडली. अखेर येथे दाखल झालेल्या पोलिस पथकाने पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर वाहतूक व्यवस्था पूर्ववत झाली. 

महाड - महाड औद्योगिक क्षेत्रातील टेमघर नाल्यात कारखान्यांचे सांडपाणी मिसळल्याने हा नाला प्रदुषित झाला असुन याकडे एमआयडीसीने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी व संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी टेमघर पूलावर रास्ता रोको केले. अचानक झालेल्या या रास्तारोकोमुळे औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अर्धा तास कोलमडली. अखेर येथे दाखल झालेल्या पोलिस पथकाने पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर वाहतूक व्यवस्था पूर्ववत झाली. 

दरम्यान, या प्रकारामुळे या भागातील पिण्याचे पाणीही दुषित झाल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषण, आग व वायू गळतीने निर्माण झालेली असुरक्षितता यामुळे परिसरातील नागरिकांनी संघर्ष समीतीही स्थापन केली आहे. या समितीने टेमघर नाला प्रदुषित झाल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यात आज पुन्हा येथे मोठ्या प्रमाणात प्रदुषित पाणी साठून राहिल्याने ग्रामस्थ व संघर्ष समितीचे कार्यकर्ते संतप्त झाले. या सर्वांनी एकत्रित येऊन एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावरील टेमघर नाल्यावरील पूलावर वाहने अडवून रास्ता रोको केला. येथे वाहतूक कोंडी झाल्यानंतर पोलिस निरिक्षक आबासाहेब पाटील यांनी आपल्या पथकासह येथे दाखल झाले व त्यांनी वाहतूक पूर्ववत केली. 

या नाल्यातील पाणी सावित्री नदीत झिरपत असते. या नदीवरील जॅकवेलमधून या भागातील बिरवाडी, आसनपोई, कांबळे, नडगाव, कॅालनी व इतर ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. कालपासून पाणी गढूळ व पिण्यायोग्य येत नसल्याची तक्रार एमआयडीसीकडे करण्यात आलेली होती. अशुध्द पाणी मिळत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. या प्रकारनंतर प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पोलिस उपअधिक्षक प्रांजली सोनावणे व संघर्ष समितीचे अध्यक्ष सिताराम महाडिक व पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली. प्रांताधिकारी यांनी एमआयडीसीला सुचना करुन हा प्रश्न सोडवण्यास सांगितले आहे. 

एमआयडीसीकडून नाल्यातील पाणी काढून टाकण्याचे आश्वासन देण्यात आले होते, ते पाळले गेले नाही. एमआयडिसी, प्रदुषण मंडळ, कारखानदार संघटना कोणीही ही जबाबदारी घेत नाही. प्रश्न सुटला तर आंदोलन करण्याची गरज राहणार नाही असे संघर्ष समितीचे उपाध्यक्ष संदेश बोबडे यांनी सांगितले आहे.

Web Title: polluting the Temghar canal people on strike