रानबांबुळीच्या जैवविविधता पार्कची दुर्दशा

Poor condition of Ranbambuli Biodiversity Park
Poor condition of Ranbambuli Biodiversity Park

सिंधुदुर्गनगरी-  सामाजिक वनीकरण विभागामार्फत रानबांबुळी येथे जैवविविधता पार्कची निर्मिती करण्यात आली; मात्र सद्यस्थितीत या पार्कची दुरवस्था झाली आहे. या पार्कच्या निर्मितीसाठी खर्च केलेला लाखो रुपये निधी वाया गेला आहे. 

उत्तमराव पाटील वन उद्यान निर्मिती योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात निसर्ग संरक्षण करणारे जैवविविधता पार्क उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्‍यातील रानबांबुळी येथे सामाजिक वनीकरण विभागामार्फत जैवविविधता पार्कची निर्मिती करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आलेल्या या पार्कच्या स्वच्छतेकडे आणि देखभालीकडे सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. सद्यस्थितीत या पार्क मध्ये लावण्यात आलेल्या विविध औषधी वनस्पतींपेक्षा जंगली झुडपे आणि गवत दिसत आहे. 

जिल्ह्यातील वन आणि वनेतर जमिनीत जैवविविधतेसह निसर्ग संवर्धनाच्या उद्‌देशाने हा प्रकल्प राबवला गेला होता. राज्यातील 34 जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा प्रकल्प जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरीलगत असलेल्या रानबांबुळी येथे पंधरा एकर जागेत उभारण्यात आला आहे. या जैवविविधता पार्कमध्ये औषधी वनस्पती उद्यान, फुलपाखरू उद्यान, दीक्षा उपदिषा उद्यान, स्मृतीवन, बांबू लागवड करून या फार्ममध्ये येणाऱ्यांना तेथील प्रत्येक झाडाचे नाव समजावे यासाठी संबंधित झाडाच्या नावाचे फलक तसेच या ठिकाणी पर्यावरण अभ्यासाला चालना देणारे उपक्रम राबविण्याचा संकल्प आहे. 

या जैवविविधता पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली आहे; मात्र त्यानंतर या उद्यानातील झाडांची देखभाल आणि उद्यानाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेला दिसत आहे. ज्यांना लाभ मिळावा अशा ज्येष्ठ नागरिक मुले आणि पर्यटक, पर्यावरण अभ्यासक कोणी या इकडे फिरकलेले दिसत नाहीत. 

मूळ संकल्पनाच बाजूला 
लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प कडे दुर्लक्ष झाल्याने शासनाची मूळ संकल्पनाच बाजूला पडली आहे. या जैवविविधता पार्कमध्ये असलेले बालोद्यान, तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी काही वेळ विश्रांती घेता यावी यासाठी ज्येष्ठ नागरिक पार्क निर्माण करण्याची संकल्पना होती. 

प्रशासन लक्ष देईल का? 
या पार्कमध्ये सर्वांना मुक्त फिरता यावे यासाठी पायवाटेची सुविधा उपलब्ध करण्यात येणार होती; मात्र सद्यस्थिती पाहता जंगली जनावरां व्यतिरिक्त तिथे कोणीच जात नसल्याचे दिसून येते. दाभाचीवाडी तलावाकाठी वसलेल्या या जैवविविधता पार्ककडे प्रशासन लक्ष देईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com