उन्हाळी पर्यटनाकडे पर्यटकांची पाठ

प्रशांत हिंदळेकर
मंगळवार, 9 मे 2017

मालवण : मे महिन्यातील म्हणजेच सुटीच्या हंगामातील येथील पर्यटन दरवर्षीच्या तुलनेत फारच कमी झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. नोटाबंदी पाठोपाठ वायरी भुतनाथ येथील समुद्रात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेचा फटका पर्यटन हंगामाच्या या शेवटच्या टप्प्यात व्यावसायिकांना बसल्याचे चित्र आहे. सद्यःस्थितीत मुंबईकर चाकरमानी वगळता केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातून दाखल झालेल्या पर्यटकांच्या माध्यमातून बाजारपेठेत किमान उलाढाल होत आहे. अर्थकारणात गती न मिळाल्याने पावसाळ्यात करायचे काय? याची चिंता व्यावसायिकांना लागली आहे.

मालवण : मे महिन्यातील म्हणजेच सुटीच्या हंगामातील येथील पर्यटन दरवर्षीच्या तुलनेत फारच कमी झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. नोटाबंदी पाठोपाठ वायरी भुतनाथ येथील समुद्रात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेचा फटका पर्यटन हंगामाच्या या शेवटच्या टप्प्यात व्यावसायिकांना बसल्याचे चित्र आहे. सद्यःस्थितीत मुंबईकर चाकरमानी वगळता केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातून दाखल झालेल्या पर्यटकांच्या माध्यमातून बाजारपेठेत किमान उलाढाल होत आहे. अर्थकारणात गती न मिळाल्याने पावसाळ्यात करायचे काय? याची चिंता व्यावसायिकांना लागली आहे.

यावर्षी पर्यटन हंगामाची सुरवात दमदार झाली होती. मात्र शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका जिल्ह्यातील पर्यटनास बसल्याचे मधल्या काळात पहावयास मिळाले. फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ परीक्षांचा असल्याने या काळात येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मर्यादितच असते. यात शनिवार, रविवार या दोन दिवशी पर्यटकांचा ओघ जास्त असल्याचे गेल्या काही महिन्यात दिसून आले आहे. परिणामी महिन्यातील या ठराविक दिवशीच येथे पर्यटक दाखल होत असल्याने येथील पर्यटन व्यवसाय तसा मंदीतच असल्याचे चित्र होते. बाजारपेठेतील उलाढालीवरही त्याचा परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले.

मे महिन्यातील सुटीच्या हंगामात येथील पर्यटन बहरेल अशी चिन्हे होती. मात्र गेल्या महिन्यात वायरी भुतनाथ येथील समुद्रात आठ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने येथे दाखल झालेले पर्यटक माघारी परतले. याचा मोठा फटका गेल्या महिन्यात येथील पर्यटन व्यावसायिकांना बसला. उन्हाळी पर्यटनात तारकर्ली, देवबाग, वायरी भुतनाथसह अन्य किनारपट्टी भागातील रिसॉर्ट, निवास न्याहारींच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र असते. प्रत्यक्षात यावर्षी मात्र किनारपट्टी भागातील रिसॉर्ट, हॉटेल्स, लॉज, निवास न्याहारींच्या ठिकाणी पर्यटकांकडून फारसे बुकिंग झाले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ऐन पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कमी प्रमाणात दाखल झालेल्या पर्यटकांमुळे येत्या पावसाळ्यात करायचे काय असा प्रश्‍न व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे.

मे महिन्याची सुटी म्हटली की जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी दाखल होतात. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबईकर चाकरमानी कमी प्रमाणात दाखल झाले असल्याचे दिसून येत आहे. सद्यःस्थितीत केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, कऱ्हाड, सांगली, सातारा, कोल्हापूर येथीलच पर्यटक येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यास दाखल होत असल्याचे चित्र आहे. या पर्यटकांमुळेच बाजारपेठेत काही प्रमाणात उलाढाल सुरू आहे. पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने एरव्ही स्कूबा, स्नॉर्कलिंग, वॉटरस्पोर्टसच्या ठिकाणी होणारी पर्यटकांची गर्दीही फारच कमी झाल्याचे चित्र आहे. वायरी भुतनाथ येथील दुर्घटनेचा जलक्रीडा प्रकारांनाही फटका बसल्याचे दिसून येत आहे.

मे महिन्याच्या सुटीत रानमेव्यांबरोबर विविध प्रकारच्या आंब्याचा आस्वाद लुटण्यास मुंबईकर चाकरमानी तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात; मात्र यावर्षी आंब्याचा मौसम लवकर संपल्याने त्याचबरोबर काजूगर, जांभूळ यांच्यासह अन्य फळांची मागणी कमी झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळेही येथील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत उन्हाळी पर्यटनात पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. महिन्यातील शेवटच्या दोन आठवड्यात तरी पर्यटकांचा ओघ वाढेल अशी अपेक्षा व्यावसायिक बाळगून आहेत.
चौकट

मत्स्याहारी थाळ्यांचे दर कमी
पर्यटन हंगामात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. त्यामुळे वाढत्या मागणीमुळे मासळीच्या दरातही वाढ होत असल्याचे गेल्या काही वर्षात सातत्याने दिसून आले आहे. मात्र यावर्षी पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मासळीचे दर स्थिरावले असल्याचे चित्र आहे.सध्या सुरमई 700 ते 750 रुपये किलो, बांगडा 1500 रुपये टोपली, पापलेट 1000 ते 1200 रुपये किलो, कोळंबी 400 ते 450 रुपये किलो, पेडवे 500 रुपये टोपली या दराने बाजारात उपलब्ध आहेत. मासळीचे दरही स्थिरावलेले असल्याने हॉटेल्समधील मत्स्याहारी थाळ्यांचे दरही कमी झाले आहेत.

Web Title: Poor response of Tourists in konkan