कोंडी धनगर वाड्यातील गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट खडत

road
road

पाली - तळागाळातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध उपाययोजना करते. मात्र दुर्गम आणि दऱ्याखोऱ्यातील मुले अजूनही या सेवा सुविधांपासून कोसो दूर आहेत. आजही सुधागड तालुक्यातील कोंडी धनगर वाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट खडतर आहे. येथील विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक च्या पुढील शिक्षणासाठी अत्यंत दुरवस्था झालेल्या रस्त्यावरुन आठ किलोमीटरची पायपीट करावी लागते. हा रस्ता पूर्णपणे जंगलातून जातो. अश्या प्रतिकुल परिस्थितीत येथील तीन गरीब विद्यार्थी दहावीची परिक्षा देत आहेत. 

सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडा म्हणजे उत्पनाचे कोणतेही साधन नसलेल्या आणि हातावर पोट असलेल्या गरिबांचे गाव. गावपर्यंत एसटी ची सुविधा नाही. येथून जवळपास चार साडेचार किमी अंतरावर नागशेत गावाला एसटी येते. मात्र नागशेत ते कोंडी धनगर वाड्यापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून नवीन रस्ता सोडाच पण जुन्या रस्त्याची साधी डागडुजी देखील झालेली नाही. त्यामुळे येथे मोठाले खड्डे पडले आहेत.  दगड व माती वर आली आहे. येथून चालणे देखील दिव्य आहे. ही वाट तुडवत कोंडी धनगर वाड्यात पोहचलो. येत्या 1 तारखेला दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या येथील तीन विद्यार्थ्यांसोबत सकाळने संवाद साधला. प्रथम रविना बावधने ही मुलगी भेटली. तिच्यासोबत सकाळने गप्पा मारल्या. नववीत 70 टक्के मिळविले आणि दहावीत ती 70 टक्क्यांहून अधिक टक्के काढणार आहे. पुढे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असल्याचे रविनाने सांगितले. ती स्वतः घरी अभ्यास करते. शाळेतील शिक्षक मदत व मार्गदर्शन करतात. तिला दोन लहान भाऊ आहेत. एक तिच्यासोबतच शाळेत जातो. घरची परिस्थिती हलाखीची वडील जेमतेम असलेली शेती करतात. शाळेत पायी जायला एक ते सव्वा तास आणि पुन्हा घरी यायला तेवढाच वेळ जातो. वाट जंगलातील आणि आड वळणाची असली तरी भीती वाटत नाही व शिकायचे असेल तर कष्ट करायलाच पाहिजे असे तिने सांगितले. 

संतोष कोकरे या होतकरू मुलाला गोठ्यात अभ्यास करतांना पाहिले. अतिशय विनम्रपणे त्याने सकाळशी संवाद साधला. त्याला नववीला 75 टक्के मिळाले तो दहावीला 80 टक्के गुण मिळवणार आहे . त्याचे आई-वडील 5-6 वर्षांपासून भिऱ्याला असतात. वडील साफसफाईचे काम करतात. एक भाऊ त्यांच्या सोबत राहतो, तो अकरावीला आहे. संतोष कोंडी धनगर वाड्यात त्याची आजी व आत्येभावासोबत राहतो. तो म्हणतो शाळेत जातांना रोज चालायचा त्रास होतो. चालण्यात खूप वेळ वाया जातो त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन करावे लागते. पण खुप शिकायचे आहे सैन्यात जाऊन देशसेवा करायची आहे. असे संतोषने सांगितले अभ्यासाची पुस्तके व अपेक्षित शाळेतील शिक्षकांनी पुरवली आहेत. शाळेची फी वडील घरी आल्यावर देतात मात्र पैशाची अडचण येतेच. तसे अभ्यासातील सर्वच विषय आवडतात पण गणित आणि इतिहास अधिक रुची असल्याचे संतोष ने सांगितले. काही वर्षांपूर्वी शाळेतून सायकली मिळाल्या होत्या मात्र रस्ताच इतका खराब आहे की तेथून सायकल नेणे दुरापास्त असल्याचे संतोष म्हणाला. जंगल वाटेतून जातांना कधी कधी रानडुक्कर आणि भेकर दिसतात. पण ते प्राणी त्यांच्या वाटेने निघून जातात असे त्याने सांगितले. संतोष चा आत्येभाऊ संदीप झोरे हा देखील आठवी पासून संतोष सोबत कोंडी धनगर वाड्यातच राहतो. दोघेही एकाच वर्गात शिकतात. संदीपला नववीला सरासरी टक्के मिळाले असले तरी दहावी पास होण्यासाठी तो परिश्रम करत आहे. संदीपचे वडील वारले असून आई पुण्याला असते. या सर्व मुलांना परीक्षेसाठी पालीतील ग. बा. वडेर हायस्कुल हे केंद्र मिळाले आहे. त्यामुळे आता पुन्हा त्यांच्या वाटयाला परिश्रम आले. 

या मुलांना कोंडजाई शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब सदाशिव साळुंखे तसेच शिक्षक सुरेंद्र अहिरराव, महेंद्र जाधव असे सर्वच शिक्षक आणि संस्था पुढे जाण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करतात. दप्तर आणि वह्या स्वयंसेवी संस्थांमार्फत मिळतात. या शाळेत कोंडी धनगरवाड्यातील जवळपास आठ ते दहा मुले शिकत आहेत. मागील वर्षी येथील निकिता बावधने, निकिता गोरे, सुनीता ढेबे आणि राम ढेबे हे चारही विद्यार्थी दहावी पास झाले. निकिता आणि रामने प्रथम श्रेणी मिळविली होती. घरची अत्यंत हालाखीची परिस्थिती असणाऱ्या कोंडी धनगर वाड्यातील मुलांना शिक्षणासाठी मदतीची आणि सहकार्याची आवश्यकता आहे. सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे तसेच अध्यक्ष विठ्ठल घाडगे आणि टाटा कॅपिटल यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आवश्यक मदत केली जाते.

ठाकरे घराण्याचे कुलदैवत 
येथील कोंडजाई देवी ठाकरे घराण्याचे  कुलदैवत आहे. अनेकवेळा राज ठाकरे कोंडजाई देवीच्या दर्शनासाठी येतात. उद्धव ठाकरे देखील येथे दर्शनासाठी काही वेळा आले आहे. मात्र असे असूनही येथील बिकट रस्त्याकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही. राजकारणी देखील केवळ मतांसाठीच येथे येतात.

या मुलांच्या घरची आर्थीक परिस्थिती बेताची आहे. उन्हात, पावसापाण्यात या जोखमीच्या रस्त्यावरून त्यांना पायपीट करत शाळेत यावे लागले. खडतर परिस्थितीत शिक्षण घेण्याचा या मुलाचा प्रयत्न आहे. मुलाच्या प्रगतीसाठी शाळेकडून अतिरिक्त वेळ देऊन मार्गदर्शन केले जाते, सराव घेतला जातो. त्यांना घडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com