डाक सेवक 25 पासून संपावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

मालवण - ग्रामीण डाक सेवकांच्या प्रलंबित मागण्या व सातवा वेतन आयोग लागू केला नसल्याने 25 ला सकाळी सहा वाजल्यापासून डाक सेवकांनी बेमुदत संप पुकारला आहे. 26 ला ओरोस शिवाजी पुतळा ते सिंधुदुर्गनगरी डाक अधीक्षक कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती डाक सेवक संघाचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू धुरी, सचिव जे. एम. मोडक यांनी आज दिली. 

देशभरात तीन लाख डाक सेवकांच्या प्रलंबित मागण्या तसेच सातवा वेतन आयोग त्वरित लागू करण्यासाठी 25 ला बेमुदत संप घोषित करण्यात आला आहे. सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी कमलेश चंद्रा गुप्त यांच्या समितीने केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालावर केंद्र सरकारने ठोस पावले उचलली नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. 

नाशिक येथे 22 ला महाराष्ट्र सर्कल ग्रामीण डाक सेवकांचे अधिवेशन होत आहे. यात नवी दिल्लीचे जनरल महासचिव एस. एस. महारेवय्या व कामगार नेते ज्येष्ठ विधीतज्ज्ञ गुरुदास गुप्ता मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनाला जिल्ह्यातून अभिमन्यू धुरी, जे. एम. मोडक व बंडू घाडीगावकर सहभागी होणार आहेत. 1977 च्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामीण डाक सेवकांना खात्यात सामावून घेऊन सरकारची पेन्शन लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय प्रमोशन, मेडिकल सुविधा, विमा संरक्षण मिळावे याही प्रमुख मागण्या असणार आहेत. तरी जिल्ह्यातील डाक सेवकांनी 26 ला काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चासाठी सकाळी दहा वाजता ओरोस शिवाजी पुतळा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन डाक सेवा संघातर्फे करण्यात आले. केंद्र शासनाने डाक खात्याच्या 47 लाख कर्मचारी व 53 लाख पेन्शनर्सना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. ना पगारवाढ, ना फरकाची रक्कम मिळाल्याने कमी पगारात संसाराचा गाढा हाकायचा कसा? असा प्रश्‍न त्यांनी आज प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. 

Web Title: postal service strikes