खड्ड्याने घेतला तलाठ्याचा बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

कणकवली - मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली रतांब्याचा व्हाळ येथील अपघातात हरकुळ खुर्द येथील तलाठी उत्तम रत्नू पवार (वय 48) यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यात पवार यांच्या डोकीला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. 

कणकवली - मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली रतांब्याचा व्हाळ येथील अपघातात हरकुळ खुर्द येथील तलाठी उत्तम रत्नू पवार (वय 48) यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यात पवार यांच्या डोकीला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. 

पवार बहुजन चळवळीतील अग्रणी नेतृत्व होते. कवी, साहित्यिक क्षेत्रातही त्यांची वेगळी ओळख होती. खड्डेमय महामार्गामुळे त्यांचा बळी गेल्याचे समजताच तालुक्‍यातील नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिस निरीक्षक सुनील मोरे यांना घेराओ घातला. खड्डेमय रस्त्याला महामार्ग विभाग जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. हा गुन्हा दाखल होईपर्यंत अंत्यसंस्कार होणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली. सुमारे दोन तास घेराओ सुरू होता. पोलिस निरीक्षक मोरे यांनी सरकारी अभियोक्‍त्यांची चर्चा करून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करू, अशी ग्वाही दिली. यानंतर घेराओ मागे घेण्यात आला.
 

कणकवली तहसील कार्यालयातील जमाबंदी रजिस्टर व इतर साहित्य घेऊन पवार सकाळी साडेदहाच्या सुमारास दुचाकीने कणकवली ते फोंडाघाट असे निघाले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली-परबवाडी येथे आले असता खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. काही प्रवाशांनी ही घटना सांगितली. ट्रक गुजरात येथून गोव्याकडे जात होता. ट्रक उदयप्रसाद मुत्तुप्रसाद गुप्ता (वय 36, रा. झारखंड) चालवत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
 

अपघातानंतर जिल्हाधिकारी, प्रांत यांच्या गाड्यांचा ताफा याच मार्गाने निघाला होता. जिल्हाधिकारी उदय चौधरी, प्रांत संतोष भिसे, नायब तहसीलदार भारतकुमार रजपूत यांनी कणकवलीच्या दिशेने जाणारी रुग्णवाहिका थांबवून पवार यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. रेनकोटमुळे त्यांची ओळख पटली नव्हती. खिशातील ओळखपत्रामुळे ओळख पटली. ही घटना समजताच शेकडो नागरिकांनी, पवार यांच्या मित्रपरिवाराने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी होती.
 

महामार्गावरील खड्ड्यामुळे पवार यांचा बळी गेला, हे समजताच अंकुश कदम, सुदीप कांबळे, नगरसेवक गौतम खुडकर, महेश परुळेकर, विद्याधर तांबे, सुनील तांबे, डॉ. बी. जी. कदम, नामानंद मोडक, शैला कदम यांच्यासह अनेकांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कणकवली पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक मोरे यांना घेराओ घातला. महामार्ग खड्डेमय आहे. बांधकाम विभाग त्यावर काहीच करत नाही. यापुढे खड्ड्यात पडून कुणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी अधिकारी आणि अभियंत्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. सुमारे दोन तास घेराओ सुरू होता. अखेर श्री. मोरे यांनी सरकारी अभियोक्‍त्यांशी चर्चा करून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करू, असे आश्‍वासन दिले. उद्या (ता. 23) सकाळपर्यंत महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास उत्तम पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंकार होणार नसल्याचा इशाराही देण्यात आला.

सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात गेली पंचवीस वर्षे कार्यरत असलेल्या पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे, शेखर राणे, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायंगणकर, नायब तहसीलदार भारतकुमार रजपूत, पी. बी. पळसुले, सामाजिक कार्यकर्ते व्ही. डब्ल्यू. सावंत, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कॉंग्रेस मागास सेलचे अध्यक्ष संदीप कदम, सुधीर कांबळे, अंकुश कदम, महेश परुळेकर, रावजी यादव, नगरसेवक गौतम खुडकर, सुनील कदम, विद्याधर तांबे, सुनील तांबे, डॉ. व्ही. जी. कदम, नीलेश पवार आदींनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. पवार यांच्या मागे पत्नी, आठ वर्षांची मुलगी, भावजय आणि पुतणी, विवाहित बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी पोलिस दलात सिंधुदुर्ग मुख्यालय येथे कार्यरत आहेत.

आज अंत्यसंस्कार
सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातील अग्रणी नेतृत्व असलेल्या उत्तम पवार यांच्यावर उद्या (ता. 23) सकाळी दहा वाजता भिरवंडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कणकवली बुद्धविहार येथे ठेवण्यात येणार आहे.

खड्डा सात फूट लांब, अर्धा फूट खोल
महामार्गावरील जानवली येथील खड्ड्याची लांबी सात फूट, रुंदी दीड फूट, तर खोली सात इंच एवढी आहे. या खड्ड्यात पाणी असल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. कणकवली ते सावंतवाडीदरम्यानचा मार्ग पूर्णत: खड्डेमय आहे. कणकवली ते खारेपाटण टप्प्यात जानवली येथे एकच मोठा खड्डा आहे. हा खड्डा चुकविताना वाहनचालकांची तारांबळ उडते. 

Web Title: Potholes talathi deth