सुरेश प्रभूंनी नकार दिल्यास रिंगणात - प्रमोद जठार

सुरेश प्रभूंनी नकार दिल्यास रिंगणात - प्रमोद जठार

देवगड - ‘माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी राज्याची विधानसभा सोडून आता थेट दिल्लीला गवसणी घालण्याची इच्छा प्रकट केली आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनानुसार ते लोकसभेसाठी स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना निवडणूक लढविण्यास सांगितले जाऊ शकते. त्यांनी नाही म्हटले तर आपण लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार आहोत, असे श्री. जठार यांनी जामसंडे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

जामसंडे येथील टिळक स्मारक सभागृहात पक्षाची बैठक झाली. त्यानंतर श्री. जठार पत्रकारांशी बोलत होते. या वेळी सभापती जयश्री आडिवरेकर, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, सरपंच कृष्णा तथा बाबा आमलोसकर आदी उपस्थित होते. 

श्री. जठार म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या पक्षाध्यक्ष शहा यांच्या सूचना आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने पक्षाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात बांधणी सुरू करून तयारी सुरू केली आहे. यात भाजपतर्फे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री प्रभू यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी माघार घेतल्यास लोकसभेसाठी आपण इच्छुक आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी युती, आघाडीवर विसंबून न राहता कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. रोजगार विषयावर आपण रिंगणात उतरून मतदारसंघाची बेरोजगारी दूर केल्याशिवाय राहणार नाही.’’ 

ते म्हणाले, ‘‘तालुक्‍यात ८ ते १२ जानेवारी या कालावधीत बैठका घेतल्या जाणार आहेत. कणकवली मतदारसंघासाठी पक्षाचे पूर्णवेळ विस्तारक म्हणून विलास हडकर यांची निवड केली आहे. संघटना मजबुतीकरणावर भर राहील. घराघरात सुबत्ता येण्यासाठी भाजप गरजेचा आहे.’’ 

नाणारचा विरोध बेगडी 
आजवर आघाडी सरकारची सर्वच फसवी पॅकेज होती. मात्र, भाजप सरकारने नाणार प्रकल्प आणण्याबरोबरच महामार्ग चौपदरीकरण करून दाखविले. अनेकांचा नाणार प्रकल्पाला बेगडी विरोध असून, ‘वोट बॅंक’ जाईल यासाठी विरोध असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com