...तर नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प

...तर नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प

कणकवली - प्रदूषणाच्या कारणामुळे नव्हे तर प्रकल्पाला आवश्‍यक तेवढी जागा उपलब्ध न झाल्याने नाणार येथील रिफायनरीची अधिसूचना रद्द झाली आहे. पुढील काळात जागा उपलब्ध झाली तर नाणार येथेच रिफायनरी प्रकल्प होईल, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली. 

दरम्यान, आपण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. त्यांनी तो वाचला व फाडूनही टाकला. मात्र, नाणारच्या मुद्दयावर चर्चेसाठी त्यांनी मुंबईत बोलावले आहे. पुढील दोन दिवसांत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. त्याच बैठकीत लोकसभा निवडणूक लढविण्याबाबतही चर्चा होईल, असे श्री.जठार म्हणाले.

येथील शासकीय विश्रामगृहात श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘‘चिपी विमानतळ उद्‌घाटन कार्यक्रमावेळी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप जिल्हा कार्यकारिणीने भेट घेतली. त्यानंतर नाणार प्रकल्प रद्द झाल्यामुळे जनतेमध्ये उठलेल्या रोषाबाबतची माहिती त्यांना दिली. जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही सोपवला. ते म्हणाले, ‘‘नाणार प्रकल्पामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गातच्या प्रत्येक घरातील एकाला नोकरी मिळणार आहे. हा प्रकल्प व्हायलाच हवा. त्यासाठी इथल्या बेरोजगारांसह शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, व्यापारी, विक्रेते आदी सर्वच घटकांतील मंडळींनी आवाज उठवायला हवा.’’

बेरोजगारांची थट्टा
श्री. जठार म्हणाले, ‘‘नाणारमुळे प्रदूषण होतेय तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राणेंना कसा चालतो. त्यामुळे प्रदूषण होणार नाही का? तसेच प्रदूषणाचा मुद्दा असेल तर शिवसेनेने सी वर्ल्ड प्रकल्पाला विरोध का केला? गेल्या साडे चार वर्षात आडाळीत एमआयडीसीमध्ये उद्योग का आणले नाहीत. सर्वच राज्यकर्त्यांना बेरोजगारांची थट्टा चालवली आहे.’’

राणे तसे प्रकल्प केव्हा आणणार ?
एवढी वर्षे राणे सत्तेत होते; पण त्यांना प्रदूषणविरहित प्रकल्प आणता आला नाही. आता वयाची सत्तरी उलटली. आता ते प्रदूषणविरहित प्रकल्प कधी आणणार व त्यातून रोजगार केव्हा निर्माण होणार? असा प्रश्‍न श्री. जठार यांनी केला.

त्यामुळेच शिवसेनेचा विरोध
नाणार प्रकल्प शिवसेनेच्या मंडळींनीच आणला; मात्र, त्याला स्वाभिमान पक्षाने विरोध केला. त्यानंतर आपली खासदारकी पणाला लागेल, म्हणून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही विरोधाची री ओढली. यात रत्नागिरी-सिंधुदुर्गवासीयांना हक्‍काचा रोजगार गमवावा लागल्याची खंत श्री. जठार यांनी व्यक्‍त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com