पर्यटकांनो सावधान ! पाळंदे किनारपट्टीवर पोहायला येताय ?
तेव्हा भरती असताना किंवा भरतीनंतर ओहोटीची सुरुवात होताना पोहायला जाण्यास प्रचंड धोकादायक आहे.
हर्णे (रत्नागिरी) : दापोली तालुक्यातील पाळंदे येथील किनारपट्टीवर वाळू वाहून जाऊन हाच तो निसर्गनिर्मित खड्डा तयार झाला आहे. ज्याच्यामुळे अनेकांचे जीव गेलेत. तेव्हा भरती असताना किंवा भरतीनंतर ओहोटीची सुरुवात होताना पोहायला जाण्यास प्रचंड धोकादायक आहे. तेव्हा पर्यटकांनी या धोक्याच्या ठिकाणी पोहण्यास जाऊ नये असे आवाहन ग्रामस्थांकडून केले जात आहे.
हेही वाचा -
पाळंदे समुद्रकिनारा तसा खूप सुरक्षित आहे. परंतु एक खडक असून त्याठिकाणी असा खड्डा आहे. कोकणात दरवर्षी पाऊस भरपूर प्रमाणात पडतो. त्या पावसाळ्यात या बीचवर एके ठिकाणी दोन तीन खडक आहेत. त्याठिकाणी लाटांचा मारा होऊन तेथील वाळू वाहून जाते. तिथे खूप मोठा खड्डा तयार होतो. हा खड्डा ७ फूट खोल असतो परंतु भरती आल्यावर वाळू वाहून जाऊन त्याची खोली जास्त वाढते. त्यामुळे हा खड्डा प्रचंड धोकादायक ठरतो. याठिकाणी पोहायला गेलेला इसम या खड्ड्यांतून बाहेर येणं कठीणच जात. हा खड्डा साधारण फेब्रुवारी महिन्यापर्यंत बुजून जातो. त्यानंतर काहीही याठिकाणी धोका नसतो पण जूनपासून पुन्हा पावसाळा सुरू झाल्यानंतर हा खड्डा बुजेपर्यंत हा धोका असतो हा प्रकार फार पूर्वीपासून असून नैसर्गिकच आहे.
याच भागाला पाळंदे गावातील बुजुर्ग जाणकार पूर्वीपासूनच चाळण असे म्हणतात. आजही या भागाला पाळंदे गावात चाळणच या नावानं संबोधले जाते. दरम्यान याच चाळणीत सहा वर्षांपूर्वी एक मासेमारी करणारी छोटी फायबर बोट बुडाली होती. त्यावेळी त्या नौकेमध्ये सहाजण होते, त्यापैकी चारजणांना पाळंदे ग्रामस्थांनीच वाचवले होते. त्यांच्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना साधारण सप्टेंबर महिन्यात घडली होती. त्यानंतर साधारण तीन वर्षांपूर्वी साताऱ्यामधील सहा पर्यटकांमध्ये तीन मुली आणि तीन मुलगे भरतीच्या वेळी याच चाळणीत उतरले असता बुडाले होते. यावेळीसुद्धा ग्रामस्थांनी धाव घेऊन तीन मुलींना वाचवले होते. या घटनेतही तीन मुलांचा जीव गेला होता.
हेही वाचा - घरोघरी मासे विकून सोडवला उदरनिर्वाहाचा प्रश्न -
तीन दिवसांपूर्वी महाडहून ८ जण पर्यटक आले होते. त्यापैकी ७ पर्यटक याच चाळणीत भरतीच्या वेळी पोहायला गेले होते. आणि सातही पर्यटक बुडाले असते परंतु यांच्यापैकी किनाऱ्यावर असणाऱ्या चालकाने आरडाओरड केल्यामुळे ग्रामस्थांनी ५ जणांना वाचवले. यावेळीही दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. दिवाळीच्या दिवशी दोन पर्यटक बुडण्याच्या घटनेनंतर सलग दोन ते तीन दिवस परत त्याच ठिकाणी भरतीच्या वेळी पर्यटक पोहत होते. ग्रामस्थांनी अनेक वेळा विनंती करून झालेल्या घटनेसंदर्भात माहिती देऊन चाळणीत पोहायला जायला मज्जाव करून सुद्धा पर्यटक ऐकतच नव्हते. यासाठी काय करायचे याचा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.
"दापोली तालुक्यातील पाळंदे गाव तस किनारपट्टीच्या दृष्टीने अतिशय सुंदर आणि सुरक्षित आहे. पर्यटन व्यवसायात बऱ्यापैकी उभारी घेत आहे. कोरोनंतर चौपाटीवर चांगलीच पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. या उद्योगातून ग्रामस्थांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळत आहे. परंतु या चाळणीच्या ठिकाणी घडणाऱ्या घटनांना आळा बसण्यासाठी पोलीस खाते आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्त विद्यमाने यावर सूचनांचे फलक, एक ते दोन सुरक्षारक्षक याठिकाणी पारित करणं आवश्यक आहे."
- अभिजित भोंगले, ग्रामस्थ
"दोन पर्यटक बुडण्याची घटना घडल्यानंतर दापोली पोलीस स्थानकातच पोलिसांची कुमक कमी असल्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे. तसेच त्याठिकाणी जेवढे अपघात झालेले आहेत त्या महितीचा फलक व या ठिकाणी पोहण्यास न जाण्याचे संदेश असलेला फलक ग्रामपंचायतीला सूचित करून लावून घेणार आहे."
- राजेंद्र पाटील, दापोली पोलीस निरीक्षक
संपादन - स्नेहल कदम