राष्ट्रपतींच्या भेटीने भाग्य उजळणार?

मंडणगडला लष्करी छावणीचे स्वरूप; प्रशासकीय यंत्रणा सतर्क
President Ram Nath Kovind
President Ram Nath Kovind sakal

मंडणगड : भारताचे राष्ट्रपती महामहीम डॉ. रामनाथ कोविंद हे १२ फेब्रुवारीला भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावाला भेट देत असून राष्ट्रपतींच्या या दौऱ्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील झाडून सगळे प्रशासकीय अधिकारी कामाला लागलेले दिसत आहेत.

मंडणगड तालुक्याला अक्षरशः लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे, तर या संपूर्ण दौऱ्यावर पोलिसांसह गुप्तचर यंत्रणांची बारीक नजर आहे. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यानिमित्त प्रशासनाने जय्यत तयारी सुरू आहे. या दौऱ्यानिमित्ताने प्रशासनाने योग्य ती दक्षता घेतली आहे.

राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांचा या दौऱ्यातील कार्यक्रम कसा आहे, या विषयी यंत्रणेने अधिकृत कोणतीही जाहीर घोषणा अद्याप केलेली नसली तरी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात राष्ट्रपती हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी मौजे आंबडवेचे भेटीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. याशिवाय गावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर विद्यांमदिरात त्याची भेट व येथे जाहीर कार्यक्रमाची तयारी सुरू असून त्यासाठी आवश्यक असलेल्या आलिशान मंडपासह विविध सुविधाबाबींची पूर्तता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येथे अतिशय मर्यादित लोकांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमाचे संकेतही मिळालेले आहेत.

स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपतींची पहिलीच भेट..

देशाच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपतींनी मंडणगड तालुक्याला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असून, राष्ट्रपतींच्या आंबडवे दौऱ्यामुळे ही संधी तालुक्याला प्राप्त झाली आहे. १२ फेब्रुवारी हा दिवस मंडणगड तालुक्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे.

एक नजर..

  • गावातील रस्ते चकाचक

  • स्मारकाची रंगरंगोटी

  • पूर्वतयारी अंतिम टप्प्यात

  • अशी आहे तयारी

  • मौजे शिरगाव येथे चार हेलिपॅड

  • त्याच ठिकाणी स्वच्छतागृह, इतर सुविधा

  • सुरक्षेची अत्यंत चोख व्यवस्था

  • श्वानपथक व बॉम्बशोधक पथक

  • सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्या जणांची असेल उपस्थिती

  • अधिकृत प्रवेशितांची कोरोना चाचणी

गेल्या तीन दिवसांपासून पूर्वतयारी व युद्धपातळीवर अनेक घडामोडी घडत आहेत. मौजे आंबडवे येथे आलिशान सभामंडप उभारण्यात येत आहे. मंडपात केवळ मोजक्या लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांना अधिकृत प्रवेश दिला जाणार आहे, त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. आंबडवे येथे डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाला रंगरंगोटी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com