विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी ‘जलदगतीने शिक्षण’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

राज्य शासनाची योजना - नववीमध्ये नापास विद्यार्थ्यांची माहितीही मागविणार; शिक्षकांनाही मिळणार प्रशिक्षण

कणकवली - एप्रिल २०१६ मध्ये झालेल्या नववीच्या परीक्षेत राज्यातील १ लाख ५४ हजार ३८१ विद्यार्थी नापास झाले होते. हे विद्यार्थी नापास का झाले, याचा खुलासा शिक्षण विभाग प्रत्येक विद्यालयाकडून मागविणार आहे. तसेच यंदाच्या नववी परीक्षेत विद्यार्थी नापास होऊ नयेत यासाठी ‘जलदगतीने शिक्षण’ योजना राबविली जाणार आहे. यात शिक्षकांच्याही प्रशिक्षणाचा समावेश आहे.

राज्य शासनाची योजना - नववीमध्ये नापास विद्यार्थ्यांची माहितीही मागविणार; शिक्षकांनाही मिळणार प्रशिक्षण

कणकवली - एप्रिल २०१६ मध्ये झालेल्या नववीच्या परीक्षेत राज्यातील १ लाख ५४ हजार ३८१ विद्यार्थी नापास झाले होते. हे विद्यार्थी नापास का झाले, याचा खुलासा शिक्षण विभाग प्रत्येक विद्यालयाकडून मागविणार आहे. तसेच यंदाच्या नववी परीक्षेत विद्यार्थी नापास होऊ नयेत यासाठी ‘जलदगतीने शिक्षण’ योजना राबविली जाणार आहे. यात शिक्षकांच्याही प्रशिक्षणाचा समावेश आहे.

राज्यातील लाखो विद्यार्थी दरवर्षी नववी परीक्षेतील प्रामुख्याने गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांत नापास होतात. त्यातील ठराविकच मुले पुढील शिक्षण पूर्ण करतात, तर उर्वरित मुले शिक्षण सोडून अन्यत्र जातात.

या नववी नापास विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार नववी नापास विद्यार्थी ज्या शाळांत आहेत, त्या शाळांतील शिक्षकांकरिता भाषा, गणित, इंग्रजी आणि विज्ञान या प्रमुख विषयांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच एप्रिल २०१६ मधील वार्षिक परीक्षेत जे विद्यार्थी नववीत नापास झाल्यानंतर पुन्हा त्याच वर्गात बसले असतील त्यांच्या विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे, तर यंदा ऑक्‍टोबर २०१६ मध्ये सहामाही परीक्षेत ४५ टक्‍केपेक्षा कमी गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचीही अभ्यासाची विशेष तयारी करून घेतली जाणार आहे.

गतवर्षी नववी परीक्षेत नापास झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी यंदा दहावी परीक्षेचा १७ नंबर फॉर्म भरला असेल, त्याबाबतची माहिती शासनाला कळवावी लागणार आहे. तसेच नववी नापास झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला नेला असेल, त्यांचीही संपूर्ण माहिती सरल प्रणालीच्या माध्यमातून शासनाला ३१ जानेवारीपर्यंत कळवावी, असे निर्देश राज्य शासनाने अध्यादेशाच्या माध्यमातून दिले आहेत.

नववी परीक्षेत कुठलाही विद्यार्थी नापास होऊ नये यासाठी आता शिक्षकांना विशेष दक्ष राहावे लागणार आहे. यात सहामाही परीक्षेत ज्यांना गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना अनुभव, चिंतन, अनुकरण, प्रयोग व उपयोजना या प्रणालीनुसार शिक्षित केले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, शैक्षणिक व्हिडिओज तसेच पाठ्यपुस्तकातील संकल्पना वेगळ्या पद्धतीने शिकवाव्यात, असेही निर्देश शासनाने दिले आहेत. पौगंडावस्थेतील समस्या, सोशल मीडिया आदी कारणांमुळे विद्यार्थी नापास होत असतील, तर त्याबाबतही शिक्षकांना समजून घ्याव्या लागणार आहेत, तर पुढील वर्षापासून नववी आणि दहावीत एकही मूल अनुत्तीर्ण न झालेल्या शाळांचा विशेष सन्मान शासनस्तरावरून होणार आहे.

नापास विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्ष
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या माध्यमातून नववी नापास किंवा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘जलदगतीने शिक्षण’ या नावाने विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे. यात माध्यमिक स्तरावर नापास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे विद्यार्थीनिहाय ट्रॅकिंग करून मुलांना क्‍लिष्ट विषयातील संबोधासाठी तज्ज्ञ शिक्षक व इतर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Web Title: To prevent the leak rate of students 'learning faster'