अरूणा प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग रोखला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

धरणाच्या पाण्यात काही प्रकल्पग्रस्तांची घरे बुडाली. त्यामुळे संतप्त झालेले प्रकल्पग्रस्तांनी यापुढे आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत प्रकल्पाचे काम करू न देण्याचा निर्णय घेतला आहे.

वैभववाडी - अरूणा प्रकल्पाचे उर्वरित काम करण्याच्या हेतुने धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याच्या निर्णयाला आज प्रकल्पग्रस्तांनी जोरदार विरोध दर्शविला. प्रकल्पग्रस्तांनी सांडव्यात उतरून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय तुर्तास स्थगित केला. 

प्रकल्पग्रस्तांचा लढा

अरूणा प्रकल्पाच्या घळभरणीचा पहिला टप्पा मे मध्ये पुर्ण झाला. त्यानंतर धरणात पावणेदोन टीएमसी पाणीसाठा करण्यात आला. धरणाच्या पाण्यात काही प्रकल्पग्रस्तांची घरे बुडाली. त्यामुळे संतप्त झालेले प्रकल्पग्रस्तांनी यापुढे आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत प्रकल्पाचे काम करू न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने विविध पातळ्यांवर प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरू आहे. 

पाणी सोडले तर सांडव्यात जावु असा इशारा

अरूणा प्रकल्पाचे उर्वरित काम करण्यासाठी धरणातील पाणी कमी आवश्‍यक आहे.त्यामुळे पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याचा विसर्ग आज सकाळी आठ वाजल्यापासुन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.धरणातुन पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यामुळे नदीपात्रात लोकांनी उतरू नये असे आवाहन करण्यात आले होते. ही माहीती प्रकल्पग्रस्तांना समजताच प्रकल्पग्रस्त माजी सरपंच सुरेश आप्पा नागप, वसंतदाजी नागप, अजय नागप, हिरालाल गुरव, सुनिल नागप, मोहन नागप, महादेव नागप, मधुकर नागप, एकनाथ मोरे, बाबु पवार, बाळकृष्ण नागप, पंकज कांबळे,जयराम कदम, शिवाजी पडिलकर आदीनी प्रकल्पस्थळ गाठले. त्यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांची भेट घेवुन आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाणी सुरू होवु देणार नाही अशी भुमिका घेतली.जर पाणी सोडले तर आम्ही सांडव्यात जावु असा इशारा देखील त्यांनी दिला. तेवढ्यावरच न थांबता सर्व प्रकल्पग्रस्त कालव्यांच्या दिशेने निघाले. त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय तुर्तास स्थगित केला. त्यानतंर प्रकल्पग्रस्तांनी तेथुन जागा सोडली. 

मुख्य अभियंत्यानी दिले आदेश 

दरम्यान अरूणा प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एस. आर. तिरमनवार यांची भेट घेतली.यावेळी प्रकल्पग्रस्तांची बाजु ऐकुन घेतल्यानतंर मुख्य अभियंत्यानी जिल्हयातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दुरध्वनीवरून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे आदेश दिल्याचे समजते.प्रकल्पग्रस्त प्रकाश सावंत, सुर्यकांत नागप, रामचंद्र नागप, सुरेश नागप, शांताराम नागप, तुकाराम नागप, रामचंद्र मोरे यांच्यासह काही प्रकल्पग्रस्तांनी मुख्य अभियंत्यासमोर भुमिका मांडली. आपल्या मागण्यांचे निवेदन देखील त्यांनी अभियंत्याना दिले. 

अरूणा प्रकल्पाचे उर्वरित काम करण्यासाठी धरणातील पाणी कमी करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार आज पाणी सोडण्यात येणार होते. परंतु काही प्रकल्पग्रस्त प्रकल्पस्थळी आले होते असे समजले. तुर्तास पाणी सोडलेले नाही; परंतु सोमवारपासुन धरणातील पाणी सोडण्यात येईल.'' 
- राजन डवरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग 

पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्याची आम्ही प्रकल्पग्रस्तांनी आज मुंबईत भेट घेतली. त्यांनी आमच्याशी सहानभुतीपुर्वक चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चा करून प्रश्‍न सोडविण्याचे आदेश त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दिले आहेत.'
- तानाजी कांबळे, प्रकल्पग्रस्त, अरूणा प्रकल्प, आखवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prevented Water Flow Of Aruna Project