सार्वजनिक स्मशानभूमीत मागासवर्गीय महिलेच्या अंत्यविधीस अटकाव

 सार्वजनिक स्मशानभूमीत मागासवर्गीय महिलेच्या अंत्यविधीस अटकाव

मालवण - काळसे येथे एका मागासवर्गीय महिलेचा अंत्यविधी सार्वजनिक स्मशानभूमीत करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. अखेर तिच्या कुटुंबीयांना त्यांच्याच घराच्या पाठीमागील जागेत अंत्यविधी करावा लागला. दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्रात ही बाब निंदनीय असून याची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्यांनी केली. 

गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी याप्रकरणी सरपंच, सदस्य, प्रमुख गावकरी तसेच संबंधित ग्रामस्थांची बैठक घेत सुनावणी घेतली जाईल. यात जर सार्वजनिक स्मशानभूमी असल्यास त्याठिकाणी कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचे अंत्यविधी, दफन करण्यास आडकाठी करता येणार नाही, अशा सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट केले.

येथील पंचायत समिती सभेला सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सहायक गटविकास अधिकारी संजय गोसावी, पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर, अजिंक्‍य पाताडे, विनोद आळवे, कमलाकर गावडे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, छाया परब, गायत्री ठाकूर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. 

काळसेत सत्यवती काळसेकर या वृद्ध महिलेचे निधन काही दिवसांपूर्वी झाले. त्यांच्या घरालगतच्या परिसरात पूर्वीपासूनची एक स्मशानभूमी होती; मात्र, त्याला कुंपण घालण्यात आले. त्यामुळे या महिलेचे पार्थिव सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेले असता, त्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. या प्रकारामुळे वादंग होऊ नये, यासाठी अखेर त्या महिलेच्या कुटुंबीयांवर घराच्या मागील जागेत अंत्यविधी करण्याची वेळ आली. याकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी सदस्यांनी केली.

मिरी महोत्सव या कार्यक्रमात डावलल्याने पंचायत समिती सदस्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध केला. तालुक्‍याच्या सभापतींना मान दिला जात नसेल, तर यापुढे तालुक्‍यात एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा सुनील घाडीगावकर, सभापती कोदे यांनी दिला.

कृषीच्या अधिकाऱ्यांना विचारला  जाब 
काही दिवसांपूर्वी बांदिवडे गावात राज्य शासनाच्या कृषी विभागाने मिरी महोत्सव घेतला. मात्र, या महोत्सवाच्या पत्रिकेवर तालुक्‍याचे प्रथम नागरिक असूनही मला स्थान देण्यात आले नाही. शिवाय ज्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम झाला, अशा उपसभापती अशोक बागवे यांच्याही नावाचा उल्लेख नसल्याने आक्रमक बनलेल्या सभापती कोदे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com