पालीतील बेकायदेशीर पार्किंगचा विळखा सुटणार

अमित गवळे
रविवार, 9 डिसेंबर 2018

''अवैध पार्किंग व नो एंट्रीतून प्रवेश करणार्‍या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. वाहनचालकांनीही नियमांचे पालन करावे''.

- रविंद्र शिंदे, पोलिस निरिक्षक, पाली

पाली : अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीला बेकायदेशीर पार्किंगचा विळखा बसला अाहे. बेकायदेशीर पार्किंग व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमुळे पालीत वारंवार वाहतूक कोंडीसह अनेक समस्या निर्माण होत अाहेत. मात्र, पोलिस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (ता.९) सकाळपासून वाहतूक पोलिस व बिटमार्शल यांनी बेकायदेशीररित्या पार्किंग केलेल्या वाहनांना जॅमर लावले. तसेच नो एंट्रीतून प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली.

पालीत रस्त्याच्या बाजुला व इतरत्र अनेक वाहने अवैध्यरित्या पार्कींग केली जातात. तसेच वाहनचालक नो इंन्ट्रीमधून आपले वाहने बिनदिक्कतपणे नेत असतात. त्यामुळे पादचारी, दुकानदार व नागरीक यांची मोठी गैरसोय होते. अवैद्य पार्कींग केलेली वाहने व नो इंन्ट्रीतून शिरकाव करणारी वाहने यामुळे पादचार्‍यांना मार्ग काढणे अवघड होते. तसेच दुकानदारांच्या व्यवसायावर देखील परिणाम होतो. सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, भाविक व व्यवसाईकांची मोठी गैरसोय होते.

अनेक दिवस या समस्येवर ठोस तोडगा काढला जात नव्हता. मात्र रविवारपासून पाली पोलीसांनी या विरोधात केलेल्या धडक कारवाईमुळे पाली बाजारपेठेसह इतर ठिकाणी होणारी वाहतुक कोंडींची समस्या मार्गी लागण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे रविवारी अवैद्यरित्या पार्क केली वाहने तसेच नो इंट्रीतून जाणार्या वाहनांचे प्रमाण घटल्याचे दिसून अाले. पाली बाजारपेठेतील वाहतूक कोंडी व बेकायदेशीर पार्कींगचा प्रश्न तुर्तास तरी सुटला आहे. वाहतुक पोलिस एस.एन. गायकवाड, बि.एम. पादीर, एस.आर.सकपाळ, निलेश पाटील, बिट मार्शल हेमंत कुथे अादी या कारवाईत सहभागी होते.

पाली हे सुधागड तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण अाहे. महत्वाची सरकारी, निमसरकारी कार्यालये, मोठी बाजारपेठ व बँका येथे आहेत. त्यामुळे अनेक नागरीक दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर पालीत येत जात असतात. त्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. तसेच येथील अनेक विकासकांनी नवनवीन बांधकामे करताना पार्किंगची व्यवस्था न केल्याने देखील अवैध पार्किंग व वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडत अाहे. नागरिकांना वाहने पार्कींग करण्यासाठी पर्यायी व कायमस्वरुपी पार्कींगची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी होत अाहे.

Web Title: Problems of Illegal parking will be solved in Pali