दलित बांधवांच्या प्रश्‍नांसाठी लढा उभारू - प्रा. गौतम कांबळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 एप्रिल 2019

सावंतवाडी - जिल्ह्यात दलित बांधवावर होणारे अन्याय, अत्याचारांना वाचा फोडण्यासोबतच आजही काही ठिकाण दलित वस्तीवर न पोहचलेल्या रस्त्याचा प्रश्‍न येणाऱ्या काळात उचलून धरण्यात येणार असल्याचा इशारा भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गौतम कांबळे यांनी दिला आहे.

सावंतवाडी - जिल्ह्यात दलित बांधवावर होणारे अन्याय, अत्याचारांना वाचा फोडण्यासोबतच आजही काही ठिकाण दलित वस्तीवर न पोहचलेल्या रस्त्याचा प्रश्‍न येणाऱ्या काळात उचलून धरण्यात येणार असल्याचा इशारा भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गौतम कांबळे यांनी दिला आहे.

येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. गौतम कांबळे बोलत होते. यावेळी भारतीय दलित महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी किशोर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रा. कांबळे म्हणाले, ""संपुर्ण महाराष्ट्रात भारतीय दलित महासंघाचे काम जोमाने सुरू आहे. आत्तापर्यंत 763 शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत; पण महाराष्ट्रात फिरत असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही मागे राहिलो होतो. त्यामुळे याठिकाणी महासंघाचे काम दलित बांधवांपर्यंत पोचवण्यासाठी संघटना बांधणी करण्यात येणार आहे.''

ते म्हणाले, ""अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपासून जो उपेक्षित आहे तो म्हणजे दलित. त्यामुळे याठिकाणी जातीपातीचे राजकारण न करता प्रशासनाला सोबत घेऊन दलितांना न्याय देण्याचे काम महासंघाचे पदाधिकारी करणार आहेत; मात्र हे करतानाच कोणीही आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र लढा उभारण्यात येणार आहे.''

लोकशाहीमुळे आज समाजात दलितांना लोकप्रतिनिधी निधी म्हणून पुढे येता आले आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात असणारे दलितांच्या समस्या सोडवण्यासाठी बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

किशोर जाधव म्हणाले, ""प्रा. कांबळे यांनी माझ्यावर सोपवलेली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पडताना या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिल्हाध्यक्ष या नात्याने दलितांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वेळोवेळी वाचा फोडण्याचा नेहमी प्रयत्न राहील.''

राज्य उपाध्यक्ष विश्‍वास कांबळे, सांगली जिल्हाध्यक्ष शैलेश पिसाळ, संजय निकम, अंकुश रोकडे, प्रभाकर चौगुले, दत्तात्रय शेट्टे, गणेश कांबळे, केशव जाधव, शशिकांत जाधव, गुरुनाथ कासले उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prof Goutam Kamble comment